नुकतीच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे फडणवीसांनी वरिष्ठांचा आदेश मानून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आधी त्यांनी स्पष्ट केलं होतं की, ते मंत्रिमंडळातून बाहेर राहतील पण मोदींनी दोनदा फोन केल्यानंतर आणि अमित शहांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारलं.
या सगळ्या प्रकरणावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, फडणवीसांचा चेहरा सांगत होता, ते आनंदी दिसत नाहीत. आरएसएसच्या संस्कारांमुळे फडणीसांनी हे स्विकारलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील हे अनपेक्षित होतं.
मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. सेनेचे 38 आमदार सोबत नेणे ही सोपी गोष्ट नाही. भाजपमध्ये वरिष्ठांच्या आदेशामध्ये तडजोड नसते. एकनाथ शिंदेंना मी फोनवर शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदेंची तयारी आधीच झाली होती असंही शरद पवार यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले की, ठाकरेंनी मोकळ्या मनाने राजीनामा दिला.
आमदार सोबत नेणं हे शिंदेंचं यश होतं. आमदार राज्याबाहेर जातात ही साधी गोष्ट नाही. फडणवीसांबाबत ते म्हणाले की, लोकांमधून बहुमत मिळवलं असतं तर त्यांना शाबासकी दिली असती. तसेच शिवसेना संपुष्टात येणार नाही, असा विश्वासही यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय अजून झाला नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाशी माझा अधिक संपर्क राहिलेला नाही. या सर्वाची तयारी फार पूर्वीपासून सुरु होती. सुरत ते गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास झाला. उद्धव ठाकरे एखाद्यावर विश्वास टाकल्यावर त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी द्यायची, अशा स्वभावाचे आहेत. उद्धव ठाकरेंनी संघटनेची, विधिमंडळाची जबाबदारी पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर दिली होती, त्याचा हा परिणाम आहे, असं शरद पवार म्हणाले.
ईडीसारख्या एजन्सीद्वारे अनेक आमदारांची चौकशी सुरू आहे. 5 वर्षांपुर्वी आम्हाला ईडीचं नाव माहिती झालं. वेगळ्या विचारांच्या व्यक्तींविरोधात ह्या एजन्सी वापरल्या जातात. दरम्यान, अनेक बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, राज ठाकरे अशा अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे.