शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शरद पवारा यांनी देशाचं नेतृत्व करावं, पंतप्रधान व्हावं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. यावेळी ते पुण्यातील प्रसार माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी शरद पवार आणि शिवसेनेचे संबंध यांच्याबाबत बोलताना बाळासाहेबांचा हवाला दिला. म्हणाले, शरद पवार साहेब आणि शिवसेनेने एकत्र येण्याबाबत बाळासाहेबांची विशिष्ट्य अशी भूमिका होती.शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं, पंतप्रधान व्हावं तर महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू ही भूमिका बाळासाहेबांनी अनेकदा मांडली असे राऊत यावेळी म्हणाले.
तसेच यावेळी, शरद पवार यांच्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, या देशातील विरोधी पक्षांना एकत्र करण्याची ताकद आणि क्षमता ही शरद पवार साहेब यांच्यामध्ये आहे. मी पंतप्रधान पदाविषयी बोलत नसून त्यांच्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेबाबत बोलत आहे. आता मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे पंतप्रधान पदाबाबत २०२४ मध्ये बोलू असे संजय राऊत म्हणाले.
म्हणाले, महाराष्ट्रात बदल करण्याचे सामर्थ्य कोणाकडे असेल तर ते शरद पवार यांच्याकडे आहे.मी शरद पवारांशी नेहमी संपर्कात असतो. त्यांना कित्येक वेळा म्हणालो की काहीतरी बदल महाराष्ट्रात व्हायला हवा. असे संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामकरणावरून देखील मत मांडलं.
संजय राऊत म्हणाले, औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर झालेलंच आहे. जसं प्रयागराजचं नामकरण केलं तसं केंद्रानं औरंगाबादचंही नामकरण करावं, तसा प्रस्ताव राज्यातून केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, संजय राऊत,शरद पवार आणि सचित सामंत यांची काल पुण्यात संयुक्त मुलाखत झाली.
मुलाखती दरम्यान संजय राऊत यांना ईडीच्या कारवाईबाबत विचारले, त्यावेळी संजय राऊत म्हणाले,धाडींना आपण खाबरत नाही. माझ्या नातेवाईकांच्या घरी जेव्हा ईडीने धाड टाकली त्या रात्री मी दिल्लीत होतो. धाडीच्या दुसऱ्या दिवशी मी गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला त्यांना सांगितलं मी दिल्लीत आहे. मला अटक करा, माझ्या निकटवर्तीयांना त्रास देऊ नका. मी घाबरत नाही. असे सांगितले असल्याचं म्हणाले.