mohan bhagwat : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत नसलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आता अचानक चर्चेत आले आहेत. चर्चेत येण्याच कारण म्हणजे नुकतच त्यांनी केलेलं एक मोठं विधान..! आता भागवत यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
वाचा नेमकं भागवत यांनी काय म्हंटलंय..?
विदर्भ संशोधन मंडळाच्या विद्यमाने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ.मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन भागवत होते. यावेळी बोलताना भागवत यांनी म्हंटलं आहे की, ‘प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या, आता जातीभेद संपायलाच हवा.’
पुढे बोलताना भागवत म्हणाले, ‘सामाजिक समता हा भारतीय परंपरेचा एक भाग होता, पण आता तो विसरला गेला आहे. मात्र, त्याचे घातक परिणाम आपल्याला पहायला मिळत आहेत. मागच्या पिढ्यांनी सर्वत्र चुका केल्या आहेत आणि भारतही त्याला अपवाद नाही.’
याचाच धागा पकडत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. समाजातील एका मोठ्या वर्गाला काही पिढ्या यातना सहन करावा लागल्या. त्या यातनांशी संबंधित जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्या घटकांना याची जाण व्हायला लागली हा बदल योग्य असल्याच पवार म्हणाले.
तसेच मात्र माफी मागून चालणार नाही. तर व्यवहारात या वर्गाबाबतची भूमिका कशी घेत आहोत यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे, असं ठामपणे पवार म्हणाले. नुकतीच शरद पवारांनी नागपुर दौरा केला. या दौऱ्यावेळी माध्यमांशी बोलताना पवारांनी भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
तर दुसरीकडे, मोहन भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यावर ब्राम्हण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, मोहन भागवत यांची मागच्या वर्षभरातली अनेक विधानं बघितली तर निश्चितच ती आक्षेपार्ह आहे अशी हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ब्राह्मणांनी माफी मागायला पाहिजे हे जे त्यांचे कालचे वक्तव्य होते ते अतिशय चुकीचे आणि अभ्यासरहित आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. खरंतर आता विषय मिटला आहे. पन्नास, शंभर, दोनशे वर्षांपूर्वी काय झालं हे सगळं विसरून नवीन गाडीत एकत्र बसलो असताना मोहनरावांना ते उगाळण्यात काय अर्थ आहे? हा आमचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.