महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्याला जाणार होते. पण अयोध्येचे खासदार बृजभूषण सिंग यांनी त्यांना विरोध केला होता. तसेच राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, असे बृजभूषण सिंग यांनी म्हटले होते. (sharad pawar on bribhushan singh)
त्यानंतर राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याला स्थगिती दिली होती. पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये शरद पवारांचा हात असल्याचा आरोप केला होता. मनसे कार्यकर्त्यांनी बृजभूषण सिंग यांच्यासोबतचा शरद पवारांचा फोटो शेअर केला होता. त्यावरुन त्यांनी हा आरोप केला होता.
अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी बृजभूषण सिंग यांच्यासोबतच्या संबंधांवर वक्तव्य केले आहे. बृजभूषण सिंग हे मॅनेज होणारे व्यक्ती नाहीत, असे वक्तव्य शरद पवार यांनी म्हटले आहे.
मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा ३० वर्षांपासून अध्यक्ष आहे. मी अध्यक्ष असताना राष्ट्रीय संघटनेचं काम बृजभूषण पाहतात. आम्हा लोकांना तिथं लक्ष द्यायला वेळ नाही. ते दिल्लीमध्ये असतात त्यामुळे ते या कामात लक्ष घालतात, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
तसेच त्यांची काही मते आहे. विचारधारा आहे. पण आम्ही खेळाच्या क्षेत्रामध्ये ते आणत नाही. त्यांनी जी काही मतं मांडली ती त्यांची वैयक्तीक मतं होती. त्यांना कुणी मॅनेज केलं हे डोक्यातून काढून टाका. बृजभूषण कोणाला मॅनेज होतील, अशी व्यक्ती नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी जेव्हा अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. तेव्हा बृजभूषण सिंग यांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे राज ठाकरेंनी दौऱ्याला स्थगिती दिली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बृजभूषण सिंग यांचा शरद पवारांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तसेच यासर्वांमध्ये शरद पवारांचा समावेश असल्याचा आरोपही करण्यात आला होता.