बॉलिवूड सिनेसृष्टीत ‘कपूर’ (Kapoor) हे खूप मोठे घराणे आहे. दीर्घकाळापासून कपूर कुटुंबीय सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत. तर या घराण्यातील पाचव्या पिढीतील अभिनेता रणबीर कपूरने नुकतीच अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न केले. त्यानंतर कपूर कुटुंब आणि त्यांची नाती माध्यमात पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
यादरम्यान कपूर घराण्यातील तिसऱ्या पिढीतील दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांचा मुलगा आदित्य राज कपूरने नुकतीच एका मुलाखतीत बोलताना पित्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत वक्तव्य केलं आहे. यावेळी आदित्य राज कपूरने म्हटले की, वडिल शम्मी कपूर यांच्या दुसऱ्या लग्नाबाबत ते अनभिज्ञ होते. तसेच हे लग्न कुठे झालं याबाबतही त्यांना काही माहिती नव्हती.
आदित्य राज कपूर यांनी नुकतीच ई-टाईम्सला मुलाखत दिली. यावेळी बोलताना आदित्य यांनी त्यांच्या पित्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला. आदित्य हे दिवंगत अभिनेता शम्मी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री गीता बाली यांचा मुलगा आहे. आदित्य जेव्हा नऊ वर्षांचे होते तेव्हा त्यांचा आईचे निधन झाले होते.
शम्मी कपूर यांनी गीता बाली यांच्याशी प्रेमविवाह केला होता. परंतु, १९६५ साली गीता यांचं आजारपणामुळं निधन झालं होतं. त्यामुळे शम्मी कपूर यांनी आदित्य आणि कांचन या त्यांच्या दोन्ही मुलांसाठी नाईलाजाने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी नीला देवी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.
ई-टाईम्सशी बोलताना आदित्य यांनी म्हटले की, ‘जेव्हा माझ्या वडिलांनी नीला देवी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याबाबत त्यांनी आम्हाला काहीच माहिती दिली नव्हती. त्यावेळी मी केवळ १३ वर्षाचा होतो आणि आम्हाला आमच्या नातेवाईकांच्या घरी सोडण्यात आलं होतं. माझ्या वडिलांनी सकाळच्या वेळेतच नीला देवी यांच्याशी लग्न केलं होतं’.
‘जेव्हा आम्ही सायंकाळी वडिलांना भेटलो तेव्हा त्यांनी नीला देवी यांची आम्हाला आमची आई म्हणून ओळख करून दिली. त्याक्षणी मला वाईट काहीच वाटलं नव्हतं. उलट मी खूप खूश होतो कारण मला आई मिळाली होती. त्यानंतर मी लगेच नीला देवी यांना आई म्हणून मिठी मारली’. तसेच माझी आई नीला देवी एक अप्रतिम महिला आहे, असेही आदित्य यांनी यावेळी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या :
अखेर इंडियन आयडॉल फेम सायली कांबळेने बॉयफ्रेंडसोबत उरकले लग्न, पहा लग्नाचे व्हिडीओ-फोटो
सचिनची लाडकी सारा तेंडुलकर दिसणार चित्रपटात? बॉलिवूड डेब्यूबद्दल समोर आली ‘ही’ माहिती
कंगनाचे लहानपणी झाले होते लैंगिक शोषण; स्वत:च खुलासा करत म्हणाली, एक मुलगा मला वाईट पद्धतीने..