पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यांमध्ये पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. यातच आता गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. गोव्यात शिवसेनेचा हिरमोड होताना दिसत आहे.
गोवा विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होताना दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसेना ही खूपच पिछाडीवर दिसत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला मिळणारी मतं ही ‘नोटा’ ला मिळणाऱ्या मतांपेक्षा कमी आहेत.
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मात्र दोघांची गोव्यातील स्थिती सध्या सारखीच असल्याचं दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार, गोव्यात शिवसेनेला 0.25 टक्के मतं मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1.06 टक्के मतं आहेत.
म्हणजेच आकडेवारीची तुलना केल्यास, नोटालाही या दोन्ही पक्षांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत, असे दिसते. 1.17टक्के मतदारांनी ‘नोटा’ चा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गोव्यातील स्थिती पाहून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
सध्या गोव्यात भाजप आघाडीवर आहे. भाजपला गोव्यात सर्वाधिक मतवाटा मिळाला आहे. भाजपनंतर काँग्रेस, मगोप, आप, तृणमुल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक आहे. त्यामुळे सध्या गोव्यात शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पत्ताच कट झाल्याचं चित्र दिसत आहे.
सध्या शिवसेना पक्षाचे गोवा आणि उत्तर प्रदेश मधील चित्र सारखेच दिसत आहे. उत्तर प्रदेश आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये शिवेसेनेने मोठा गाजावाजा करत उमेदवार रिंगणात उतरवले होते. तसेच, पक्षाचा स्टार चेहरा असलेल्या आदित्य ठाकरे यांनाही शिवसेनेने प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. मात्र, असे असूनही शिवसेनेला दोन्ही राज्यांमध्ये पाय रोवता आलेला नाही.