बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानशी संबंधित एक दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या दाव्यात एका बातमीचा व्हिडिओ शेअर केला जात आहे. रिपोर्टनुसार, शाहरुख खानला सुरक्षा तपासणीसाठी अमेरिकेच्या विमानतळावर थांबवण्यात आल्याचं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.
या व्हायरल झालेल्या बातमीमध्ये, ‘शाहरुख खानला अमेरिकेच्या विमानतळावर का थांबवण्यात आलं’ या आशयाचे कॅप्शन दिलं आहे. या बातमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांचा देखील या बातमीमुळे गोंधळ उडाला आहे.
मात्र, या बातमीचा तपास केल्यानंतर निष्पन्न झाले की, व्हायरल दावा लोकांची दिशाभूल करणारा आहे. वास्तविक सध्या व्हायरल होणार व्हिडीओ हा 2016 चा आहे, जेव्हा शाहरुख खानला अमेरिकेच्या विमानतळावर तपासणीसाठी थांबवण्यात आले होते.
व्हिडीओला काळजीपूर्वक पाहिले असता, व्हायरल व्हिडिओमध्ये वरच्या उजव्या बाजूला ‘न्यूज 24’ लोगो दिसत आहे. व्हायरल दावा आणि News24 शी संबंधित कीवर्डसह शोध घेतल्यास 12 ऑगस्ट 2016 रोजी News24 च्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओची संपूर्ण आवृत्ती सापडली.
माहितीनुसार, हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानचा अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्नियामध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला होता. शाहरुखच्या दुबईतील बोर्डिंग पासवर सुरक्षेचा SSSS टॅग लावण्यात आला होता.
सेकंडरी सिक्युरिटी स्क्रीनिंग सिलेक्शन (SSSS) या टॅगमुळे विमानतळाच्या प्रत्येक चेकपॉईंटला कडक तपासणीला सामोरे जावे लागते. यामुळेच शाहरुखला अमेरिकन विमानतळावर थांबवण्यात आले होते. हाच जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.