राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
अशोक गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा ३०ऑगस्ट २०२२ रोजीच राष्ट्रीय पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पक्ष सोडताना आपल्यासाठी सर्व पक्षांची दारे खुली असल्याचं त्यांनी सांगितले.
बुधवारी नेरुळ येथे ते बोलत होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर गंभीर आरोप केले. म्हणाले, नवी मुंबई बाहेरील व्यक्ती जिल्हा काँग्रेस कमिटीत ढवळाढवळ करित होत्या. जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, प्रशांत पाटील यांच्यासह भावना घाणेकर यांनी पक्षात सातत्याने गटातटाचे राजकारण केले.
तसेच म्हणाले, नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील आणि नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला निरीक्षक भावना घाणेकर यांनी वर्षभरापासून मला विश्वासात न घेता परस्पर बैठका घेऊन माझ्याविषयी कार्यकर्त्यांत गैरसमज पसरवले, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
अशोक गावडे म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद तीन वर्षांपूर्वी आपण स्वीकारले होते. पक्ष वाढीसाठी जीवाचे रान केले. स्वतः चा पैसा खर्च केला. पक्ष वाढीसाठी करत असलेल्या कार्याचा अहवाल जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना वेळोवेळी दिला.
मात्र, पक्षातील वरिष्ठांकडून आपणास मार्गदर्शन व सहकार्य लाभले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून समजते.