Supriya sule : …विधवेचा थरथरता हात पाहून सुप्रिया सुळेंचाही कंठ दाटला; प्रसंग वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

आजही आपल्या समाजात विधवा स्त्रीला मानाचे स्थान नाही. शुभ कार्यापासून तिला डावलले जाते. तिच्याकडून आगत स्वागत देखील करून घेतलं जात नाही. मात्र काही ठिकाणी आपल्याला याच्या उलट परिस्थिती देखील पाहायला मिळते. अनेक कुटुंबात विधवा स्त्रीला आपल्या लेकीप्रमाणे वागणूक देऊन, तिला कुटुंबात मान सन्मान देण्यात येतो.

असाच काहीसा प्रकार काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पाहायला मिळाला. काल त्या उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. यावेळी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांनी आपल्या विधवा सुनेच्या हातून कुंकू लावून सुप्रिया सुळे यांचं स्वागत केलं.

सासरा आपल्या विधवा सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेला पाहून सुप्रिया सुळे भावूक झाल्या. सुप्रिया सुळे यांनी या खास प्रसंगाचा अनुभव फेसबुक पोस्ट करून व्यक्त केला. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. सध्या त्यांनी केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे, म्हणाल्या, आयुष्यभराचा जोडीदार अचानक निघून जाण्याचं दुःख खुप मोठं आहे. पण त्यामुळे आयुष्य थांबू नये. प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा तो भरभरुन जगण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. तिच्या पाठीशी तिच्या कुटुंबियांनी ठामपणाने उभं राहिलं पाहिजे.

तसेच सुळे म्हणाल्या, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या घरी भेट दिली, तेव्हा वसंतरावांचा हा एक वेगळाच पैलू पहायला मिळाला. त्यांच्या मुलाचं नुकतंच निधन झाले. मुलाच्या निधनाचं दुःख पचवून ते सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

https://fb.watch/fTxvcU66vS/

वसंतराव नागदे यांनी सुनेच्या हातून आम्हा सर्वांचे स्वागत केले. स्वागताचे कुंकू लावताना सुनबाईंचा हात थरथरला. पण वसंतरावांनी तिला धीर दिला. हा सगळा प्रसंग अतिशय भावूक करणारा, नवी दिशा देणारा आणि आश्वासक असा होता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.