अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिना उलटला तरी त्याची क्रेझ काही कमी झाली नाही. टॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वत्र केवळ ‘पुष्पा’चीच चर्चा आहे. चित्रपटातील अल्लू अर्जूनच्या स्टाईल, डान्स आणि डायलॉग्सवर सोशल मीडियावर रिल्सचा पाऊस सुरु आहे. यादरम्यान आता ‘पुष्पा’ चित्रपटाचा मराठी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘खास रे’ नावाचा युट्यूब चॅनल आपल्या भन्नाट क्रिएटिव्हिटीसाठी ओळखला जातो. या चॅनलवर ‘पुष्पा’ चित्रपटाचा मराठी ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. मूळतः मराठी आशयाचे व्हिडिओ तयार करणाऱ्या या युट्यूब चॅनेलवर अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाला मराठमोळा तडका देण्यात आला आहे. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाचा मूळ ट्रेलर आणि ‘हे बिड्डा…’ या गाण्यामधील काही दृश्य वापरून त्याला मराठी संवाद जोडत हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. ‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जूनचा दाढीखालून हात फिरवतानाचा सीन आणि ‘झुकेगा नही’ डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला होता. तर आता या व्हिडिओत त्या सीनला ‘पुष्पा… पुष्पाराज एकटाच बस समद्यांना….’, हा मराठी संवाद जोडण्यात आला आहे.
तसेच ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजे क्या… फायर है’ या डायलॉगच्या ठिकाणी ‘पुष्पा नाव ऐकून गुलाबाचं फूल वाटलो काय? बॉम्ब हाय मी…’, असा डॉयलॉग वापरण्यात आला आहे. याशिवाय ‘हे बिड्डा’ या गाण्यामध्ये ‘हे बिड्डा हे आमचा अड्डा… हे बिड्डा मी हाय लयी येड्डा’ असे शब्द वापरण्यात आले आहेत. पहा ‘पुष्पा’चा मराठी व्हर्जनधील ट्रेलर.
‘पुष्पा’चा हा मराठी ट्रेलर मराठी प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ काल बुधवारी (१९ जानेवारी) चॅनलवर शेअर करण्यात आला होता. तर आतापर्यंत व्हिडिओला २५ हजारापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकजण यावर कमेंट करत ‘खास रे’ च्या टीमचे कौतुक करत आहेत. तसेच अनेकजण संपूर्ण चित्रपटसुद्धा मराठीत डब करण्याचा सल्लाही खास रे टीमला देत आहेत.
दरम्यान, ‘पुष्पा’ चित्रपट मागील वर्षी १७ डिसेंबर रोजी तेलुगूसह, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ७ जानेवारी रोजी दाक्षिणात्य भाषेत आणि १४ जानेवारी रोजी हा चित्रपट हिंदी भाषेत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.
अमेझॉन प्राईम व्हिडिओवर ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित झाला. तर ओटीटीवरही हा चित्रपट खूपच गाजला. पुष्पाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर आता चाहते त्याच्या दुसऱ्या भागासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर यावर्षी लवकरच ‘पुष्पा’ चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मला काहीही झालं नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका; ‘लागिरं झालं जी’ फेम नितीश चव्हाणचे आवाहन
येत्या चित्रपटात नथुराम गोडसेच्या भुमिकेत दिसणार अमोल कोल्हे; भूमिकेबद्दल बोलताना कोल्हे म्हणाले…
‘ह्या खऱ्या जिजाऊच्या लेकी’; किरण मानेंची बाजू घेणाऱ्या महीला कलाकारांचे आव्हाडांनी केले कौतूक