Share

अपक्ष आमदारांचे मॉनिटरिंग शिवसेनेकडेच होते म्हणत राष्ट्रवादीने पराभवाची जबाबदारी झटकली

काही दिवसांपासून राज्यसभेच्या निवडणुकीवरून राज्यात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. दरम्यान, काल राज्यसभेचा निकाल लागला. राज्यसभा निवडणुकीत काही अपक्ष आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवारास मते दिली नाहीत. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील काल याबाबत काही अपक्ष आमदाराच्या नावाचा खुलासा केला. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. अपक्ष आमदारांचे मॉनिटरिंग करण्याचे काम शिवसेनेकडेच होते असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी जयंत पाटील सोलापूरात पत्रकारांशी संवाद साधत होते. जयंत पाटील म्हणाले, सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे कालच्या निवडणुकीत पहिल्या पसंतीची १६३ मते आमच्या उमेदवारांना मिळाली. तर समोरच्या बाजूला पहिल्या पसंतीची १२२ मते पडलेली आहेत.

आता हा खेळ दुसऱ्या पसंतीच्या मतांनी पुढे कसे जायचे याचा होता. या दुसऱ्या पसंतींच्या मतांमध्ये आमच्यात आणि त्यांच्यात जी स्पर्धा झाली त्यात मते वळवण्याचे गणित जर व्यवस्थित केले गेले असते तर आमचाच उमेदवार निवडून आला असता. परंतु, पहिल्याच पसंतीची मते सर्वांना देण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्हाला अपयश आले,असे जयंत पाटील म्हणाले.

तसेच म्हणाले, अपक्ष आमदारांशी संवाद साधणे, त्यांना मतदानाविषयी योग्य मार्गदर्शन करणे आणि अपक्ष आमदारांचे मॉनिटरिंग करण्याचे काम शिवसेनेकडे होते. खासदार संजय राऊत यांनी जरी मते न देणाऱ्या आमदारांची नावे सांगितली असली तरी त्याबाबत आम्ही तपशीलवार माहिती घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीला जे अपयश आले त्यामागचे कारण देखील सांगितले. राज्यसभा निवडणुकीत पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते महाविकास आघाडीकडे आहेत. आमच्याकडे बहुमतातील सदस्य आहेत. मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांवर या निवडणुकीचे चित्र बदलले. आम्ही पहिल्या पसंतीच्या मतांच्या मागे लागल्यामुळे आम्हाला अपयश आले असे पाटील म्हणाले.

राजकारण

Join WhatsApp

Join Now