Share

‘एकनाथ शिंदेंच्या रुपात साक्षात देव पाहिला’; बिहारच्या कुटुंबीयांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार, काय आहे नेमकं प्रकरण वाचा

एकनाथ शिंदे राज्याचे नवीन मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक धडाडीचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या कामाचा वेग पाहून सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे. अशातच त्यांनी बिहारच्या एका कुटुंबाला केलेल्या मदतीमुळे संबंधित कुटुंबासोबत इतर जनतेच्या मनातील शिंदेंची प्रतिमा वाढली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिहारच्या एका कुटुंबाला रातोरात जीवनदान मिळून दिलं. ते कसं तर, बिहार मधील पाटणा येथे गुरसाळेमधील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता त्यांच्या राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट झाला.

या स्फोटात कुटुंबातील चारही लोकांना मोठ्याप्रमाणात भाजले. त्यांना तात्काळ पाटणा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी संबंधित रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे भाजलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या स्पेशल दवाखान्यात हलविण्यास सांगितले.

त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि Air Ambulance मिळणेसाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी Air Ambulance कंपनीने एकावेळी एकच रुग्ण नेता येईल असे सांगितले. त्यामुळे जाधव कुटुंबाचे नातेवाईक हतबल झाले.

तसेच, हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार असा प्रश्न कुटुंबातील इतर सदस्यांना पडला. नातेवाईकांनी त्यांच्या भागातील अनेकांकडे मदतीचा हात मागितला पण यश येऊ शकले नाही. नातेवाईकांचा मानसिक ताण वाढू लागला. त्याचवेळी जाधव यांच्या एका नातेवाईकाने आमदार अनिल बाबर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला.

नातेवाईकांनी सर्व घटना मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सुत्रे फिरण्यास सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ शासकीय Air Ambulance मिळण्यासाठी विनंती केली.

मात्र, तांत्रिक अडचणीमुळे शासकीय Air Ambulance उपलब्ध होऊ शकली नाही. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून २ Air Ambulance बुक केल्या. इतकेच नाही तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना संबंधित कुटुंबाला, रविवारचा दिवस उजाडण्याचा आत पुण्यात आणण्याचे आदेश देखील दिले.

जखमीपैकी ११ वर्षांच्या मुलास घेऊन काल सकाळी ६ वाजता स्पेशल विमान पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या जखमी पैकी १२ वर्षांच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान सकाळी ११ वाजता विमानतळावर दाखल झाले.

आता, पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू आहेत. एकनाथ शिंदेंनी केलेल्या मदतीमुळे नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले. एकनाथ शिंदे देवाच्या रुपात भेटले. नाव, गाव, पत्ता, ना ओळख, ना कोणाची शिफारस, काहीही माहिती नसताना शिंदे साहेबांनी आम्हाला मदत केली. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या रूपाने साक्षात विठ्ठल पाहिला, अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now