Share

‘माझ्या पुतण्याला वाचवा’ अशा हाका दिल्लीत ऐकू आल्या, शरद पवारांच्या मोदी भेटीवर मनसेचा टोला

राजधानी दिल्लीत काल 6 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी मोदींची दिल्लीत भेट घेतली यावरून, संदीप देशपांडे म्हणाले, “1773 साली ‘काका मला वाचवा’ अशा आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याश्या वेगळ्या संदर्भात ‘माझ्या पुतण्याला वाचवा’ अशा आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या,” असे म्हणत देशपांडे यांनी त्यांच्या भेटीवर खोचक टोला लगावला.

संदीप देशपांडे यांच्या अशा प्रतिक्रियेला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे ईडी कारवाईची. महाराष्ट्रात ईडीने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना दणका देत कारवाई केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती देखील ईडीने जप्त केली आहे.

असे असताना, अशीच कारवाई अजित पवार यांच्यावर होऊ नये त्यासाठी शरद पवार यांनी मोदींची भेट घेऊन पुतण्याला वाचवा असं मोदींना सांगितल्याचं संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षरित्या सुचवलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँन्डल वर या आशयाचे ट्विट केलं आहे.

https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1511879543476596740?t=kB0TtPyzswwfFwIkak6z7g&s=19

शरद पवारांनी मोदींची भेट कोणत्या कारणांसाठी घेतली याचे अनेक उलटे सुलटे अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविले जात होते. अशा वेळी, शरद पवार यांनीच त्यांच्या भेटीबद्दल माध्यमांना माहिती दिली. म्हणाले लक्षव्दीपमधील नागरिकांच्या मुलभूत सोयीसुविधांसाठी ही भेट होती.

तसेच, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल के पटेल यांनी खूप चुकीचे निर्णय घेतले. ज्यानंतर 75 हजार लोकांवर बेरोजगारीचं संकट ओढवलं. याबाबतच मोदींसोबत चर्चा केली. महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 12 आमदारांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे तो लवकरात लवकर मार्गी लावावा, तसेच महाराष्ट्रावर तपास यंत्रणांची कारवाई या मुद्यांवर मोदींशी चर्चा केली अशी माहिती पवार यांनी दिली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now