भारतात अनेक साधू किंवा बाबा आहेत. यामधील काही स्वयंघोषित आहेत तर काहींना लोकांनी बनवले आहे. यातील अनेक बाबा दैवी चमत्कार दाखवून प्रसिद्धीच्या झोतात आले. आहेत. याचंच उदाहरण सांगायचे झाल्यास ते आहेत, सत्यसाई बाबा. आता या सत्य साईबाबांची जागा घ्यायला नवीन सद्गुरूंचं आगमन झालं आहे, अशी चर्चा सुरू आहे.
स्वतःला शिर्डीच्या साईबाबांचा अवतार म्हणवून घेणारे सत्य साईबाबांचा समाजातील मोठमोठ्या लोकांवर प्रभाव होता. राजकारणापासून क्रीडा आणि चित्रपट दुनियातील लोक सत्यसाई बाबाचे चाहते होते. आता याच सत्य साईबाबांची जागा घ्यायला मधुसूदन नायडू आले असल्याची चर्चा होत आहे.
सत्य साई बाबा यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले आंध्र प्रदेशातील तीर्थक्षेत्र पुट्टापर्थी येथे सध्या नव्या सद्गुरूंच्या आगमनाने भक्तांमध्ये फूट पडली आहे. सत्यसाई बाबा यांचा 2011 मध्ये मृत्यूनंतर एका नवीन धर्मगुरूचा उदय झाल्याने 114 देशांमध्ये केंद्रे असलेल्या सत्य साई बाबाच्या आश्रमाचा वारसा धोक्यात आला आहे.
मधुसूदन नायडू नावाची व्यक्ती सत्यसाई बाबांची जागा घेणार आहे. मधुसूदन नायडू यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, ते साईबाबांच्या खूप जवळचे आहेत. मधुसूदन नायडू यांचा जीवनप्रवास फार रोमांचक आहे. 1996 मध्ये केमिस्ट्रीमधून नायडू पदवीधर झाले.
त्यानंतर ते वृंदावन कॅम्पसमध्ये सहभागी झाले, ज्यासाठी त्यांना सत्य साई बाबा यांच्याकडून सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर त्यांनी प्रशांती निलयम कॅम्पसमध्ये केमिस्ट्रीमधून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. यानंतर त्यांनी संस्थेत एमबीएसाठी प्रवेश घेतला आणि प्रथम येत पुन्हा स्वामी सत्य साई बाबा यांच्याकडून सुवर्णपदक जिंकले.
लहानपणापासूनच सत्य साई बाबांनी त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकला. श्री मधुसूदन यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनात कला आणि संगीतात प्रावीण्य मिळवले. त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या दीक्षांत नाटकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या. एक उत्तम वक्ता आणि प्रतिभावान कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती.
स्वामींच्या आशीर्वादाने कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका खाजगी बँकेत त्यांना नोकरी मिळाली. मात्र नोकरी सोडून ते स्वामींच्या सेवेत लागले. त्यानंतर साई बाबा स्वप्नात येतात असे म्हणत सत्य साईबाबांची जागा घेणाऱ्या मधुसूदन नायडू यांचा दावा सत्य साईबाबांच्या ट्रस्टवाल्यांना पटत नाही. नायडू यांच्या या आगमनाने सध्या सत्य साईबाबांच्या भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.