सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपीपैंकी एक शार्पशूटर संतोष जाधव याच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरात राज्यातील कच्छ मधून अटक केली आहे. तसेच संतोषसोबत त्याच्या सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणात संतोष जाधव आणि सूर्यवंशी या दोघांची नावं पुढं आली होती. पोलिसांना अखेर या दोघांना जेरबंद करण्यात यश आले आहे. संतोषला २०२१ मध्ये मंचर येथील बाणखेले खून प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव हा गुजरातमध्ये त्याचा साथीदार सूर्यवंशी याच्याकडे जाऊन लपला होता. पुणे ग्रामीण पोलिसांची टीम गुरातमधील भुज जिल्ह्यातील मांडवी गावात पोहोचली, तिथे त्यांनी सूर्यवंशीला ताब्यात घेतलं.
सूर्यवंशी जवळ संतोष बद्दल चौकशी केली. मात्र तो सांगायला तयार नव्हता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर सूर्यवंशी ने तोंड उघडलं. संतोष जाधवला मांडवी गावाजवळील नागोर गावात लपवलं असल्याचं त्याने सांगितले. पोलिसांनी त्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
संतोष जाधवला वेगळी खोली घेऊन देण्यात आली होती. तिथे त्याच्या जेवणाची देखील सोय करण्यात आली होती. आपण आसपास कोणाला ओळखू येऊ नाही यासाठी संतोषने डोक्याचं टक्कल देखील केलं होतं. त्यानं त्यांचा पेहराव बदलला होता. पोलिसांनी तो राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकून त्याला पकडलं.
संतोष जाधव हा लॉरेन्स बिष्णोई टोळीत सहभागी झाला होता. मात्र सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधवचा काय रोल होता याचा तपास केला जाणार आहे. माहितीनुसार, गुजरात बरोबरच दिल्लीतही पुणे ग्रामीण पोलिसांच्या टीम्स संतोष जाधव याचा शोध घेत होत्या. अखेर तो पोलिसांच्या ताब्यात सापडला. रविवारी रात्री उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्याला हजर करण्यात आले. २० जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.