दळवींनी पुढे सांगितले की, वरळी विधानसभा (Worli Assembly Area) मतदारसंघात धुरी यांना जबरदस्तीने विभागअध्यक्ष बनवण्यात आले होते. “दादर (Dadar Area) परिसरात बसून तोडपाणी करणे, नेत्यांची चमचेगिरी करणे एवढीच त्यांची ओळख होती. नगरसेवक होण्याइतकीही कुवत नव्हती, फक्त राजसाहेबांचा स्पर्श झाला म्हणून ते पुढे गेले,” असा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीत आपण तोंड उघडलं तर महाराष्ट्रात भूकंप होईल, असा इशाराही दळवींनी दिला.
मारुती दळवी यांनी आपण अजून संयम ठेवत असल्याचं सांगत, १५ दिवसांपूर्वी राज ठाकरेंना या गद्दारीची कल्पना दिल्याचा दावाही केला. “हा माणूस कधीही पक्षाशी गद्दारी करणार, असं मी आधीच सांगितलं होतं. साहेब मला बाजूला करणार नाहीत, कारण मी त्यांचा आत्मा आहे,” असं भावनिक वक्तव्यही त्यांनी केलं. त्याचवेळी काही लोक केवळ चमकोगिरीसाठी पक्षात सक्रिय असल्याचा टोला त्यांनी लगावला.
मंगळवारी मनसेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संतोष धुरी यांच्यावर दळवींनी पुन्हा हल्ला चढवला. “तुम्ही लादले गेलेले होतात, तुमच्या कामामुळे लोक पळून जातात,” अशी टीका करत त्यांनी ठाकरे बंधूंचीच मुंबई महापालिकेत सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, संतोष धुरी हे मनसेचे माजी नगरसेवक होते. मुंबई शहरातील संघटनात्मक कामात ते सक्रिय होते आणि मनसेच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग होता. मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र पराभव स्वीकारावा लागला. यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीमुळे वार्ड वाटपात अडचण निर्माण झाल्यानंतर अखेर त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.