सांगली 17 एप्रिल : सांगली जिल्ह्याचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ यांचे कौतुक केले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चाहता असल्याचे ते म्हणाले. कामाच्या बाबतील एकनाथ शिंदे यांचा हात कोणी धरू शकत नाही, असेही ते म्हणाले.
यानंतर सांगली जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेवर पुन्हा संकट कोसळणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आनंद पवार यांच्यानंतर सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख संजय विभुते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
कारण सांगलीत झालेल्या लिंगायत समाजाच्या सभेत बोलताना संजय विभुते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले होते. एवढेच नाही तर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चाहते आणि कार्यकर्ते असल्याचेही जाहीर केले आहे.
कामाच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांचा हात कोणी धरू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. आता एकनिष्ठ राहण्याचे दिवस राहिले नसून जो तगडा माणूस आहे त्याच्या पदरात पडतं अशी परिस्थिती झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
जाहीर कार्यक्रमात केलेल्या या कौतुकामुळे आता संजय विभुते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता संजय विभूते पुढे काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अजित करंजकर यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पुण्यामध्येही ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात सामील झाले.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मा.नगराध्यक्ष, मा.उपनगराध्यक्ष, 15 नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.