नुकताच राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये शिवसेनेचा पराभव झाला. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना काही अपक्ष आमदारांनी शिवसेनेला दगा दिल्याचा आरोप केला. त्यामध्ये अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या नावाचा देखील समावेश होता.
संजय राऊत यांनी देवेंद्र भुयारांचे नाव घेतल्यानंतर घडामोडींना वेग आला. भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर २४ तासातच राऊत यांना भुयार चांगले वाटू लागले. त्यांनी शिवसेनेला दगा दिला नाही असे ते बोलू लागले. राऊत यांच्या या पलटीवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
चांगला कार्यकर्ता असल्याचे सांगत राऊतांनी अप्रत्यक्षपणे भुयारांनी मतदान केल्याचे सूचित केल्याचे मानले जात आहे. तसे असेल, तर या निवडणुकीतील सहावा दगाबाज आमदार कोण असा प्रश्न शिवसेनेपुढेच उभा राहिला आहे. महाविकास आघाडीत चालू असलेल्या या घडामोडींचा भाजप चांगलाच फायदा घेत आहे.
राऊतांनी आरोप ठेवलेले अपक्ष आमदार शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटी घेतील आणि त्यानंतर साक्षात्कार होऊन राऊत, अपक्षांवरील आपले आरोप मागे घेतील, असा खोचक टोला भाजपच्या नेत्यांनी लगावला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत जे काही घडले ते एकदाच राऊतांनी जाहीर करावे, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
दरम्यान, देवेंद्र भुयार यांनी शरद पवार यांच्यानंतर संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी सवांद साधला. यावेळी भुयार म्हणाले, संजय राऊत यांचे माझ्याबद्दल जे गैरसमज होते. ते दूर झाले आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील सुप्त चर्चेमुळे तो गैरसमज झाला होता. त्या दिवशी मी मतदान केले नाही, अशी चर्चा काही पत्रकार आणि नेत्यांची सुरु होती. त्यामुळे राऊतांचा गैरसमज झाला.
तसेच भुयार म्हणाले, ज्या आमदारांनी मतदान केले नाही, त्यांची राऊत स्वत: चौकशी करत आहेत. माझ्याबाबत त्यांचे शरद पवार यांच्याशीही बोलणे झाले आहे. मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीच्या प्रतोदांनीही खुलासा केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता संपले आहे. या प्रकरणाचा तपास केला जावा, यातील कोण फुटले याची माहिती पुढे आली पाहिजे, असे भुयार म्हणाले.