एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती अद्याप थांबली नाही. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत.
त्यात आता मुंबई महानगरपालिकासह अनेक ठिकाणी निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, आणि शिवसैनिकांमध्ये पुन्हा उत्साह फुंकण्यासाठी काय काय केले जाऊ शकते यावर भर दिला जात आहे.
नुकतेच शिवसेनेची बाजू मांडणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. त्यामुळे आता त्यांच्याऐवजी खासदार अरविंद सावंत आणि आमदार निलम गोऱ्हे यांच्यावर पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी बोलवली होती.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता पक्षाची पुढची भूमिका कशी असेल तसेच भाजपला शह देण्यासाठी काय रणनिती असायला हवी यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याचे समजते. या बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने राज्याचा अपमान करत आहेत. त्यांच्याविरोधीत असंतोष आहे. तो असंतोष दडपण्यासाठी संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली. आम्ही प्रवक्ते आहोत, आता काही पोपट झालेत जे रोज काहीतरी बोलत असतात. मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे, असे अरविंद सावंत म्हणाले.
राज्यपालांनी राज्याचा अपमान केला आहे. जाती-जातींमध्ये दुही पसरवण्याचे काम त्यांनी केले. याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राऊत यांना अटक झाली आणि मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न झाला. राऊत यांच्या अटकेमुळे महत्त्वाची बातमी झाकली गेली असे सावंत म्हणाले.