Share

Sanjay Raut on India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाची मोठी गर्जना; ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन छेडणार

Sanjay Raut on India-Pakistan Match :  पाहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्याच्या वेदना अजूनही ताज्या असतानाच आशिया कप (Asia Cup 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. पण या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) वेगळा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या महिला आघाडीकडून ‘माझं कुंकू-माझा देश’ या नावाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यांनी या निमित्ताने भाजपवर (BJP) जोरदार टीका केली.

राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

संजय राऊत यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाची बैठक घेऊन या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सामना अबुधाबी (Abu Dhabi) येथे खेळवला जातोय हे लोकभावनेला विरोध करणारे पाऊल आहे. पहलगाम हल्ल्यात 26 निरपराधांचा बळी गेला, त्यांचे दुःख अजूनही शमलेले नाही. मग अशा वेळी पाकिस्तानसोबत खेळ कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राऊत म्हणाले, “पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री पाकिस्तानला धडा शिकवू म्हणतात, खून आणि पाणी एकत्र वाहणार नाही असे बोलतात. मग खून आणि क्रिकेट एकत्र कसे खेळता येईल? भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषद (VHP) यांची भूमिका काय आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं.”

महिला आघाडी रस्त्यावर उतरणार

14 सप्टेंबरला शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरणार असून आंदोलनाला ‘सिंदूर के सन्मान में, शिवसेना मैदान में’ असे स्वरूप असेल. आंदोलनादरम्यान मोदींना (Narendra Modi) महिला सिंदूर पाठवतील, अशी मोहिम देखील छेडली जाणार आहे. “हा सामना देशद्रोहासारखा आहे. भाजप नेत्यांची पोरं सामना बघायला जातील, जय शाह (Jay Shah) क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत आणि अमित शाह (Amit Shah) आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलेलो नाही,” असे राऊत म्हणाले.

बाळासाहेबांची आठवण

बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांनी नेहमीच भारत-पाक सामन्याला विरोध केला होता. एकदा जावेद मियाँदाद (Javed Miandad) मुंबईत आला तेव्हा त्यांनी त्याला चहाला बोलावलं आणि थेट सांगितलं की सामन्याची चर्चा इथे होणार नाही. काश्मीरमध्ये रक्त वाहत असताना पाकिस्तानसोबत सामना खेळणं म्हणजे देशद्रोह असल्याचं संजय राऊतांनी ठणकावलं.

त्यांनी भाजपला थेट सवाल केला “तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवता, मग निदान विरोध तरी करा. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, महिलांचा आक्रोश अजूनही सुरू आहे. अशा वेळी सामना खेळणे हे लोकभावनेला न जुमानणं आहे. शिवसेना हे सहन करणार नाही. आमच्या महिला रस्त्यावर उतरतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now