शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपावर हल्लाबोल चढवला. यावेळी बोलताना राऊत यांना भाजप नेते मोहित कंबोज यांच्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण मोहित कंबोज यांना ओळखत नसल्याचं विधान केलं. त्यावर आता मोहित कंबोज यांनी ट्विट करत याबाबत पुरावा दिला आहे.
राऊत यांना भाजप नेते मोहित कंबोज यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारले तेव्हा राऊत म्हणाले होते , ‘फडणवीसांचा फ्रंटमॅन मोहित कंबोज आहे. मोहित कंबोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे, कंबोजच्या कंपन्यांमध्ये पैसा कुठून आला हे फडणवीसांनाच माहिती आहे, असेही राऊत यांनी म्हटले होते.
त्यावर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी प्रतिउत्तर दिले होते की, संजय राऊत मला ओळखतात आणि त्यांना मी अनेकवेळा आर्थिक मदत केली आहे. मला ओळखत नाही असे म्हणणारे राऊत माझ्या घरी 4 सप्टेंबर 2017 रोजी आले होते. राऊत गणपतीसाठी माझ्या घरी येतात, त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. राऊत यांना जेव्हाही आर्थिक मदत लागली तेव्हा मी त्यांना मैत्रीमध्ये मदत केली आहे. मला ओळखत नसल्याचे ते म्हणाले. त्यांना विसरण्याचा आजार झाला असल्याची खोचक टीका मोहित कम्बोज यांनी संजय राऊत यांच्यावर केली होती.
दरम्यान, संजय राऊत यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार असून आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं मोहित कंबोज यांनी स्पष्ट केलं. माझ्यावर आरोप करणाऱ्या संजय राऊतांना मानहानी केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे देखील कंबोज म्हणाले होते.
राऊतसाहेब हे मोदींपासून सुरु करतात ते फडणवीसांवर येऊन थांबतात. मागील पाच महिन्यात हे सरकार माझ्यासारख्या माणसासोबत लढून जिंकू शकले नाहीत, असा टोला कंबोज यांनी लगावला होता. याबाबत पत्रकार परिषद घेत भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांनी राऊतांनी केलेले सर्व आरोप फेटाळले.
बिना जान पहचान के मेरे घर पर हर साल आते हैं लोग ! pic.twitter.com/zEGJQb5Kfd
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) February 15, 2022
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोहित कंबोज यांना ओळखत नसल्याचं विधान केलं होतं, त्यावर आता पुरावा देत ट्विट केलं की, ‘बिना जान पहचान के मेरे घर पर हर साल आते है लोग.’ तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यासोबत असणारा फोटो देखील शेअर केला आहे. यात संजय राऊत गणपतीच्या उत्सवादिवशी मोहित कंबोज यांच्या घरी गेलेले दिसत आहेत.