राज्यसभेच्या सहाव्या जागेचा पेच अखेर सुटला आहे. शिवसेनेने संभाजी राजे यांना शिवबंधन बांधण्याची अट घातली होती. मात्र त्यांनी ती मान्य न केल्याने संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यातच पुरस्कृत म्हणून महाविकास आघाडीने पाठबळ द्यावे, असा माजी खासदार संभाजीराजे यांचा प्रयत्न होता.
मात्र शिवसेनेने नकार देत अनपेक्षितपणे शिवसेनेचे कोल्हापूरचे संपर्कप्रमुख संजय पवार यांचे नाव पुढे केले. संभाजीराजेंना शिवसेनेने डावल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. अशातच माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji raje) यांची एक फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
संभाजीराजेंनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. “महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…”, असं या पोस्टमधून संभाजीराजेंनी म्हटलंय.
https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/pfbid02nXsRTkLNVtaR7tVLxntTuMSRMPMSg9cLxJYStUEMzh5yFmmJfq6REZECqVYVqvoMl
दरम्यान, जरी भाजप आणि महाविकास आघाडीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचं नाकारलं असलं तरी,मराठा संघटनांचा त्यांना भक्कम पाठिंबा मिळतोय. शिवसेनेकडून राजेंना उमेदवारी देण्यासाठी पक्षप्रवेशाची अट घालण्यात आली होती. मात्र राजेंनी त्याला अप्रत्यक्षपणे नकार दिला.
त्यानंतर शिवसेनेने कोल्हापुरातलाच दुसरा उमेदवार जाहीर केल्याने संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांचे समर्थक आक्रमक झाले असून, त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल केले आहे.
यामध्ये लिहिले आहे की, ‘आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती, लक्ष 2024’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. समर्थकांचा पाठिंबा पाहून, संभाजीराजे छत्रपती कोणती भूमिका घेणार? अपक्ष लढण्याच्या निर्णयावर ते ठाम राहणार का? संभाजीराजेंची पुढची रणनीती काय असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
गुजरात फायनलमध्ये पोहोचताच हार्दिक पांड्याच्या डोक्यात गेली हवा, म्हणाला, माझं नाव विकलं जातं त्यामुळं..
एका पायावर लंगडत शाळेत जाणाऱ्या अपंग मुलीच्या मदतीला धावून आला सोनू सूद; म्हणाला…
“सगळी प्रॉपर्टी विकली तरी या सायकलची सर येणार नाही”, वडिलांच्या आठवणीत वसंत मोरे भावुक