मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात बोलणं झालं नाही, तसेच आम्हाला तिथे काही बोलू दिलं नाही असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केला. तसेच संभाजीराजे छत्रपती यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका देखील त्यांनी घेतली.
मराठी क्रांती मोर्चाने केलेल्या या आरोपांवर आता संभाजीराजे छत्रपती यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट केली. म्हणाले, मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषणही केले होते.
तत्कालीन नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन जी आश्वासने दिली होती ती आता मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारीने पूर्ण करावीत. नियुक्त्यांचा विषय मार्गी लागला. हे त्या उपोषणाचेच यश आहे. समाजाच्या याच मागण्यांसाठी त्यांनी बैठक बोलाविली होती. बैठकीत सारथी संस्थेची स्वायत्तता, समाजासाठी अनेक योजना असे विषय मार्गी लागले.
मात्र, बैठकीत काही लोकांनी शिष्टाचार पाळला नाही. मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा काही जणांनी भर बैठकीत एकमेकांवरच पातळी सोडून वैयक्तिक टिप्पणी केल्याने मी शांततेचे आवाहन केले. मात्र, हा प्रकार वारंवार होत राहिल्याने समाजाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा तुमचे हेच चालू राहणार असेल, तर अशा पातळीहीन बैठकीत बसण्यापेक्षा मीच बाहेर जातो, तुमचं चालुद्या; अशी भूमिका मला घ्यावी लागली.
मी कधीही कुणाचा आवाज दाबणे शक्य नाही. परंतु, समाजाच्या नावाने उभे राहत असताना पातळीहीन वागून कुणी समाजाची नाचक्की करणार असेल, तर ते देखील मी सहन करू शकत नाही, मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी काही आज आलेलो नाही. २००७ पासून मी या चळवळीत पूर्णतः सक्रिय आहे. माझा राजवाडा, घरदार सोडून, वैभवसंपन्न जीवनशैली सोडून मी महिनो महिने समाजासाठी राज्यभर फिरत असतो.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02kUfZPvLj2TY12pP5EPCB8AVm6steSGTse86h5DDSxpPmUivPPPVvb1dJwrqGXUvxl&id=100044614891340
माझा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील. माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले. परंतु, कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही. नेता म्हणून मिरवले नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे समाजाचा एक सेवक म्हणूनच कार्यरत राहिलो व यापुढेही राहीन, अशी त्यांनी फेसबुक पोस्ट करत आपली भूमिका मांडली.