Sambhaji Raje: मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या संभाजीराजेंवर मोठा आरोप केल्याची माहिती समोर येत आहे. “संभाजीराजे बैठकीमध्ये बोलूच देत नाहीत”, असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती संभाजीराजेंवर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. तसेच मराठा क्रांती मोर्चाबाबत आता संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
काल सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठा आंदोलनात सहभागी सर्वांची बैठक होणार होती. मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत काम करणाऱ्या अनेक संघटना आणि पदाधिकाऱ्यांना यात निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हा गंभीर आरोप छत्रपती संभाजीराजेंवर लावला आहे.
संभाजीराजे बैठकीमध्ये बोलूच देत नाहीत, तसेच कोणी काही बोलल्यास बैठक सोडून निघून जाण्याची धमकी संभाजीराजांनी दिली, असा आरोप देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या संबंधित लोकांकडून करण्यात आला. मागील काही दिवसांपासून राज्यात सत्तानाट्य घडल्यानंतर मराठा समाज शांत होता.
परंतु मराठा क्रांती मोर्चाने याआधी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. नितीन गडकरींपासून शरद पवारांपर्यंत अनेकांच्या घरावर मोर्चे काढले. मात्र सरकार दरबारी मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेतली जात नव्हती, असे बोलले जात होते.
आता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात तसेच अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक बोलवण्यात आली होती. मराठा समाजाच्या मागण्या सरकार दरबारी मान्य करून घेण्याचे प्रयत्न सुरू असतानाच संभाजीराजेंवर झालेल्या या आरोपांमुळे मराठा क्रांती मोर्चा आणि समन्वयक यांच्यात फूट पडल्याचे स्पष्ट होते.
मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेत लढणारे विनायक मेटे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यानंतर मराठा आंदोलनाचा आवाज हरपल्याची भावना समाजामध्ये होती. त्यात आता मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या या आरोपामुळे अधिकच संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण लोकांमध्ये निर्माण झाल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या-
Aditya Thackeray : आनंद दिघेंच्या जुन्या आठवणींना आदित्य ठाकरेंनी दिला उजाळा, ‘तो’ खास फोटो केला शेअर
heart attack : सावधान! आजच सोडून द्या ‘या’ चार सवयी नाहीतर तुम्हालाही येऊ शकतो ह्रदयविकाराचा झटका
शरद पवारांच्या नातीचा युरोपात डंका; अशी कामगिरी केली की संपुर्ण देशाला अभिमान वाटेल