सोशल मीडियावर 10 वर्षांच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये शाळेचा गणवेश घातलेली आणि खांद्यावर बॅग लटकवत एका पायावर उड्या मारत शाळेत जात असताना ती मुलगी दिसत आहे. मुलीला एक पाय नाही. सध्या मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हे प्रकरण बिहारच्या जमुई जिल्ह्यातील आहे. जिथे सीमा नावाची ही अपंग मुलगी शाळेत जाण्यासाठी रोज एका पायावर उड्या मारत 1 किलोमीटरचा प्रवास करते. माहितीनुसार, या मुलीने एका रस्ता अपघातात तिचा पाय गमावला आहे.
मात्र, तरीही मुलगी जिद्द न सोडता रोज शाळेत एका पायावर उड्या मारत 1 किलोमीटरचा प्रवास करत आहे. तिच्या या धाडसाकडे पाहून इंटरनेटवरील जनता तिला सलाम करत आहे. मुलीबद्दल दुःख व्यक्त करत आहेत, तसेच तिच्या जिद्दीला सलाम करत आहेत.
माहितीनुसार, सीमाला खूप शिकायचे आहे. तिला पुढे शिक्षक व्हायचे आहे. शिक्षक होऊन तिला गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण दयायचे आहे, त्यांचे जीवन चांगले करायचे आहे. त्यामुळे सीमा तिला एक पाय नसताना देखील मोठ्या जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज शाळेत जाते.
https://twitter.com/vijaykumar1305/status/1529308029329743873?t=_Y51lOIslncCZo7c53PJbw&s=19
खैरा ब्लॉकच्या नक्षलग्रस्त भागात असलेल्या फतेपूर गावात ती तिच्या कुटुंबासह राहते. मुलीचे वडील खिरण मांझी बिहारबाहेर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तिची आई बेबी देवी या घरी आपल्या 6 मुलांची काळजी घेण्यात व्यस्त असतात. त्यापैकी सीमा ही दुसऱ्या क्रमांकावरची त्यांची मुलगी आहे.
दिल्ली सरकारचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती सीमाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सीमाला कृत्रिम पाय मिळतील, असे ट्विट करून सोमनाथ भारती यांनी या मुलीचा पत्ता विचारला आहे. त्यामुळे आता लवकरच सीमाला लोकांकडून मोठी मदत मिळणार आहे. तिला लवकरच कृत्रिम पाय मिळतील.