काश्मिरी पंडितांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर साई पल्लवीचं भावूक स्पष्टीकरण; म्हणाली, इथून पुढे बोलण्याआधी…

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी तसेच अनेक तरुणांची क्रश असणारी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. तिने काश्मिरी पंडितावर झालेल्या जुलूमाची तुलना मॉब लिंचिंग सोबत केली होती, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या वादावर साई पल्लवीने मौन सोडले आहे.

काही दिवसांपूर्वी साई पल्लवीने एक व्हिडिओ शेअर करत आपलं मत मांडलं होतं. ती म्हणाली होती की, मी तटस्थ वातावरणात वाढले आहे. मी डाव्या आणि उजव्या विचारसरणीबद्दल ऐकले आहे. पण, कोण बरोबर आणि कोण चूक हे मी सांगू शकत नाही.

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट दाखवतो की काश्मीरी पंडितांची हत्या करण्यात आली. तर अलीकडेच एका व्यक्तीची गायीची वाहतूक करत असताना मुस्लिम असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली. त्या व्यक्तीला मारल्यानंतर हल्लेखोरांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.

मग काश्मीरमध्ये जे घडले आणि नुकत्याच झालेल्या या घटनेत फरक काय आहे? असे साई म्हणाली होती. तिने केलेल्या या विधानामुळे मोठा गदारोळ माजला. तिच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली. अखेर तिनं पुन्हा एकदा आपण केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देत मौन सोडलं आहे.

तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलं, असं ती म्हणत आहे. साई म्हणाली, अशा माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतेय हे पहिल्यांदाच घडतंय. पण मी कायमच मनात जे असेल तर ते बोलत आले आहे.

मला माहिती आहे की मी माझी बाजू मांडण्यास थोडा उशीर केला, पण मला माफ करा. कारण मी केलेलं विधान खूप चुकीच्या पद्धतीने तुमच्या समोर समोर आणलं गेलं. मला फक्त इतकंच म्हणायच होतं की धर्माच्या नावाने कोणताही वाद चुकीचा आहे.. मी न्यूट्रल व्यक्ती आहे.

माझ्या बोलण्यानंतर बाहेर जे काही घडलं ते पाहून मला स्वत:लाच मोठा धक्का बसला. मी मुलाखतीत जे बोलले त्यातील अनेक गोष्टींचा विपर्यास लोकांनी केला आहे. लोकांनी ज्या पद्धतीने माझे विधान घेतले आहे. त्यावर मला दुःख होत आहे. मात्र, इथून पुढे बोलण्याआधी मी नक्कीच दोन वेळा विचार करेल.