काल शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाला. त्यांच्या निधनानंतर पार्थिव मुंबईतील वडाळा येथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी येऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
विनायक मेटे यांच्या अंत्यदर्शनासाठी ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते देखील आले होते. मात्र अंत्यदर्शन घेतल्यानंतर इमारतीच्या परिसरातून बाहेर पडताना विनायक मेटे यांच्या काही कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
सदावर्ते यांच्या येण्याने येथील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळली. सदावर्ते यांनी कायम मेटे यांच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच ते काळे कपडे घालून मुद्दाहून अत्यंदर्शनासाठी आले, असा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला.
कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्यानंतर पोलिसांनी सदावर्तेंना सुरक्षीत बाहेर काढलं. आता यावर सदावर्ते यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे. सदावर्ते म्हणाले, आम्ही मेटे यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना येणार असल्याचं सांगितलं होतं. पण, महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, अशा प्रकराचा हल्ला माझ्यावर करण्यात आला.
तसेच यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला. म्हणाले, शरद पवार आणि ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची चौकशी ते लोक तरुणांना हाताशी धरून अशा प्रकारचे वर्तन करायला लावतात. मात्र, सर्वच मराठा तरुण यात आहेत अस मी म्हणत नसल्याचंही सदावर्ते यांनी सांगितलं.
दरम्यान, सदावर्ते यांनी त्यांच्या भाषणातून यापूर्वी अनेकदा मराठा आरक्षणाला विरोध केला होता. विनायक मेटे यांनी आयुष्यभर मराठा आरक्षण मिळवण्यासाठी लढा दिला आहे, तर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयाच याचिका दाखल केल्या होत्या.