शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवास स्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबईच्या गावदेवी पोलिसांकडून शुक्रवारी 8 एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास अटक करण्यात आली.
इतर 105 एसटी कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेऊन अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे आज शनिवारी 9 एप्रिलला त्यांच्यासह 106 जणांना न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. भारतीय दंड विधान 141, 149, 353, 332, 452, 120 ब आणि 448 आदी कलमांच्या आधारे गुणरत्ने यांना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये हल्ला घडवून आणणे, कट रचणे, सरकारी कर्मचारी मारहाण आदींचा त्यात समावेश आहे. या संदर्भातील भाषणं पोलिसांना मिळाली आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. यातच आता ॲड. जयश्री पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत असताना , हे सगळे शरद पवार यांचे कारस्थान आहे, असा आरोप केला आहे.
तसेच ॲड. जयश्री पाटील यांनी आरोप केला की, गुणरत्न सदावर्ते यांना वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस जे. जे. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. आम्हाला अद्याप एफआयआर दाखवला नाही, असा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, सदावर्ते यांच्या जीविताला काही झालं तर त्याला शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुप्रिया सुळे जबाबदार असतील असा आरोपही त्यांनी केलाय. आम्ही पवारांविरोधात सातत्याने बोललो, त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, त्यामुळेच सदावर्तेंना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.