बेरोजगारी आणि महागाईवरून विरोधी पक्ष नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपवर दररोज हल्लाबोल करत आहेत. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी रविवारी भारतातील बेरोजगारी आणि उत्पन्नातील असमानतेवर चिंता व्यक्त केली आहे.
राजधानी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना दत्तात्रेय होसाबळे म्हणाले, २० कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत आणि २३ कोटी लोक प्रतिदिन ३७५ रुपयांपेक्षा कमी कमावत आहेत याचे वाईट वाटले पाहिजे. गरिबी हे आपल्यासमोर एक राक्षसासारखे आव्हान आहे. या राक्षसाचा नायनाट होणे गरजेचे आहे.
तसेच गरिबी व्यतिरिक्त, उत्पन्नातील असमानता आणि बेरोजगारी ही देशापुढील मोठी समस्या असल्याचे होसाबळे यांनी सांगितले. पुढे म्हणाले, देशात चार कोटी बेरोजगार आहेत, त्यापैकी २.२ कोटी ग्रामीण भागात आणि १.८ कोटी शहरी भागात बेरोजगार आहेत.
कामगार दलाच्या सर्वेक्षणात बेरोजगारीचा दर ७.६ टक्के इतका आहे, त्यामुळे योजनांची गरज आहे, असे होसाबळे यावेळी म्हणाले. पुढे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या सहा क्रमांकांमध्ये असल्याचं आकडेवारी सांगते. पण देशातील सर्वात श्रीमंत १ टक्के लोकांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक पंचमांश म्हणजे २० टक्के आहे.
तर, त्याचवेळी ५० टक्के जनतेचं उत्पन्न हे केवळ १३ टक्के आहे. ही चांगली स्थिती आहे का? असा सवालही होसाबळे यांनी केला आहे. ही आकडेवारी सांगताना होसबळेंनी एक मुद्दा उपस्थित केला आहे तो म्हणजे ‘काही प्रमाणात सरकारची अकार्यक्षमताही याला जबाबदार आहे.’
दरम्यान, देशात गेल्या आठ वर्षांपासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार आहे. अनेक राज्यांत भाजपची सत्ता आहे. अशावेळी होसबाळेंनी वाढती बेरोजगारी, गरिबी आणि आर्थिक विषमतेबद्दल चिंता व्यक्त केल्यानं भाजपच्या सत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं म्हटलं जात आहे.