Share

तब्बल ९ हजार कोटींचा बॅंक घोटाळा; ६ बांगलादेशी आरोपींच्या मुसक्या ईडीने आवळल्या

बांग्लादेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) बांग्लादेशातील बँक घोटाळ्यात सहभागी असलेल्या काही लोकांना पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. हे सर्व आरोपी बांग्लादेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, हे सर्व आरोपी बांगलादेशी नागरिक आहेत जे तेथे घोटाळा केल्यानंतर बनावट ओळखपत्रांसह भारतात राहत होते. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव प्रशांत कुमार हलदर आहे. भारतात तो शिवशंकर हलदर या नावाने राहत होता. या सर्वांना अटक करण्यापूर्वी ईडीने छापे टाकून त्यांच्या 11 ठिकाणांची झडती घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने प्रशांत कुमार हलदर, प्रितिश कुमार हलदर आणि त्यांच्या साथीदारांच्या 11 मालमत्तांवर शोधमोहीम राबवली. यात झडतीदरम्यान असे आढळून आले की, प्रशांतने त्याच्या इतर साथीदारांसह रेशन कार्ड, भारतीय मतदार ओळखपत्र, पॅन आणि पश्चिम बंगालमध्ये बनवलेले आधार कार्ड अशी सरकारी ओळखपत्रे फसवणूक करून बनवले.

ईडीने प्रशांत हलदर आणि त्याच्या या 5 साथीदारांना अटक केली आहे. ईडीचे म्हणणे आहे की अटक करण्यात आलेले बांगलादेशी नागरिक बनावट आयडीच्या आधारे भारतात अनेक व्यवसाय आणि कंपन्या चालवत होते. एवढेच नाही तर या लोकांनी पश्चिम बंगालमध्ये मालमत्ताही खरेदी केल्या आहेत.

प्रशांतवर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. कारण त्याने बांगलादेशात सुमारे 10 हजार कोटी टका म्हणजेच 9 हजार कोटी रुपये बँक घोटाळा केला होता. हा पैसा त्याने बांगलादेशाबाहेर अनेक देशांमध्ये पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

बांगलादेश आणि भारतीय पासपोर्टशिवाय ग्रेनेडाचे पासपोर्टही त्याच्याकडे सापडले आहेत. यासोबतच प्रशांत हलदरविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) ही जारी केल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. माहितीनुसार, ईडीने या सर्वांना पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत अटक केली आहे.

यात घोटाळा आणि मनी लाँड्रिंगचा मास्टरमाइंड प्रशांत कुमार हलदर यांच्यासह स्वपन मैत्रा उर्फ ​​स्वपन मिस्त्री, उत्तम मैत्र उर्फ ​​उत्तम मिस्त्री, इमाम होसेन उर्फ ​​इमन हलदर, अमना सुलताना उर्फ ​​शर्मी हलदर आणि प्रणेश कुमार हलदर यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. विशेष न्यायालयाने (पीएमएलए) 5 आरोपींना ईडी कोठडीत आणि 1 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now