रोहित शर्माने जिंकले मन: बाद झाल्यानंतरही श्रीलंकेच्या कर्णधाराला करू दिले शतक; व्हिडीओतून पहा नेमकं काय घडलं

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या या उच्च धावसंख्येच्या सामन्यात, जिथे फलंदाजांनी चांगल्या धावा केल्या, त्या सामन्याच्या शेवटच्या षटकात एक मनोरंजक गोष्ट पाहायला मिळाली.

झाले असे की जेव्हा भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी 50 व्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी आला तेव्हा श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका नॉन-स्ट्रायकरच्या टोकाकडे म्हणजेच गोलंदाजाच्या दिशेने उभा होता पण बॉल टाकायच्या आधीच तो क्रीजमधून बाहेर पडला आणि मोहम्मद शमीने त्याला आऊट केले.

शेवटी मोहम्मद शमीने धावबादसाठी अपील केल्यानंतर मैदानी पंच टीव्ही पंचाकडे गेले, मात्र भारतीय कर्णधार रोहित शर्माने अपील मागे घेतले. शमीने दासून शनाकाला धावबाद केले तेव्हा तो 98 धावांवर खेळत होता. रोहित शर्माच्या माध्यमातून अपील मागे घेतल्यानंतर शनाकानेही आपले शतक पूर्ण केले.

विस्डेन इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा म्हणाला, “मला माहित नव्हते की शमीने असे केले आहे, तो 98 धावांवर खेळत होता, आम्ही त्याला तसंच आऊट करायचं होतं जसं त्याने आम्हाला केले होते.” रोहीतच्या या दरियादिलीने त्याने क्रिकेटच्या लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 7 गडी गमावून 373 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 113, रोहित शर्माने 83 आणि शुभमन गिलने 70 धावा केल्या. विराट कोहलीचे हे ४५ वे शतक होते. लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ 50 षटकांत 8 गडी गमावून 306 धावा करू शकला.

श्रीलंकेकडून कर्णधार दासन शनाकाने 108 धावा केल्या, तर पथम निशांकाने 72 आणि धनंजय डी सिल्वाने 47 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना उमरान मलिकने ३१ आणि मोहम्मद सिराजने ३२ धावा केल्या. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारी रोजी कलकत्ता येथे होणार आहे.

टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती पण विराटची विकेट गमावल्यानंतर टीम इंडीया शेवटी कोसळताना दिसली. तो बाद झाल्यानंतर भारताच्या स्कोअरमध्ये केवळ 10 धावांची भर पडू शकली.

विराटच्या शतकासमोर शनाकाची झंझावाती खेळी व्यर्थ ठरली आणि भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी धुव्वा उडवला. विराट रोहीतसह उमराण मलिक हा नवखा खेळाडू ठरला टिम इंडीयाच्या दणदणीत विजयाचा खरा शिल्पकार. त्याने महत्वपुर्ण तीन बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

या सामन्यात (IND vs SL) विराट कोहली उत्कृष्ट लयीत दिसला. 20 व्या षटकात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना त्याने 87 चेंडूत 113 धावा केल्या. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार होता. तो फलंदाजीसाठी क्रिजवर आला तेव्हा संघाची धावसंख्या 143 धावा होती. त्याचवेळी तो बाद झाला तेव्हा संघाच्या धावफलकावर 364 धावा होत्या.

या डावात त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 73 वे शतक झळकावले, तर हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 45 वे शतक होते. क्रिकेटच्या 50 षटकांच्या फॉरमॅटमधील हे त्याचे सलग दुसरे शतक ठरले. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. त्याच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाने 374 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.