Share

‘अहिल्यादेवी होळकरांचं काम रोहित पवार पुढे नेत आहेत’; शरद पवारांकडून रोहित यांच्या कामाचे कौतूक

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही मिनिटांचे भाषण केले आणि अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी त्यांनी आपले नातू आमदार रोहित पवार अहिल्याबाई होळकरांचं काम पुढे घेऊन जात आहेत असे म्हणत रोहित यांचे कौतूक केले.

शरद पवार यांनी आपल्या काही मिनिटांच्या भाषणात अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कामाची देशातील इतर मान्यवर स्त्रियांच्या कामाशी तुलना केली आणि त्याचा संदर्भ रोहित पवार यांच्या कामाशीही जोडला. यावेळी त्यांनी अन्य कोणत्याही राजकीय विषयांवर अगर प्रश्नांवर भाष्य केले नाही.

अहिल्यादेवी होळकर यांनी कौटुंबीक संकटाच्या काळात राज्य हातात घेऊन वेगळ्या प्रशासकीय कौशल्याचा ठसा उमटविला. आपल्या हाती आलेल्या सत्तेचा जनतेच्या हितासाठी कसा वापर करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. महिलासंबंधी त्यांनी अनेक हितकारक निर्णय घेतले. सर्वधर्मसमभाव प्रत्यक्षात आणून काम केले. त्यांचे हे काम परिवर्तनाला चालना देणार होते, असे शरद पवार म्हणाले.

पुढे म्हणाले, अहिल्याबाई होळकर यांच्या कामाचा हा धागा पकडून आमदार रोहित पवार काम करत आहेत. हा भाग कायमस्वरुपी दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पूर्वी एकदा अकोले भागातील दुष्काळ पाहण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. इतक्या वर्षांत येथील प्रश्न सुटले नाहीत. मात्र, अलीकडे तुम्ही रोहित पवार या तरुण आमदाराला संधी दिली आणि कामाला सुरूवात झाली.

तसेच म्हणाले, रोहित पवार यांच्या कामांत अहिल्यादेवींच्या दृष्टीकोनाचा स्पर्श दिसतो. येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मंत्र्यांसोबत बैठका घेऊन नियोजन केले. लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या भागात एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ते काम प्रत्यक्षात येईल. त्यांनी या भागासाठी दोन प्रमुख महामार्ग मंजूर करून आणले.

अहिल्यादेवींचा पाणी, रोजगार आणि दळणवळण यावर भर होता. त्याच पद्धतीने रोहित काम करीत आहे. आतापर्यंत बरीच कामे झाली. पाच वर्षांत या भागाचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. ती मिळाली तर या भागात नवा इतिहास घडविला जाईल असे शरद पवार यावेळी आपल्या काही मिनिटांच्या भाषणात म्हणाले.

राजकारण

Join WhatsApp

Join Now