Ritesh deshmukh : रितेश-जेनेलियाचा पाय खोलात! ‘या’ प्रकरणात पक्के अडकले; भाजपने केली चौकशीची मागणी

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख हे प्रसिद्ध कपल आता अडचणीत आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या कंपनीसाठी अवघ्या १० दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड मंजूर करण्यात आला आहे. त्यावरून आता चर्चेला उधाण आलं आहे.

तसेच रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख त्यांच्या देश अँग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला यासाठी तत्परतेने १२० कोटी रुपयांचे कर्जही मंजूर झाल्याचं समोर आलं आहे, त्यामुळेही चर्चेला उधाण आलं आहे.  या कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर १२० कोटींच्या कर्जाचा पुरवठा केला, आणि त्यामध्ये एवढी तत्परता कशी दाखवली असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने १२० कोटीचा कर्जपुरवठा अवघ्या काही दिवसात कसा केला असा सवालही आता भाजपकडून करण्यात येत आहे. या कंपनीवर आता लातूर बँकेने ही आक्षेप घेतल्याचं दावाही भाजपने केला आहे.

तर दुसरीकडे, या देशमुख कपलला त्यांच्या कंपनीसाठी १० दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड मंजूर करण्यात आला, त्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लातूर एमआयडीसी भागात २०१९ पासून भूखंडासाठी १६ उद्योजकाची प्रतीक्षा यादी असताना त्यांना का डावलण्यात आलं असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

देश ऍग्रो प्रा. ली या कंपनीबद्दल अधिक माहिती म्हणजे, ही कंपनी २३ मार्च २०२१ रोजी स्थापन झाली. या कंपनीमध्ये श्री रितेश विलासराव देशमुख व जेनेलिया देशमुख हे ५०-५० टक्क्यांचे भागीदार आहेत. या कंपनीच्या स्थापने वेळी कंपनीचे भागभांडवल ७.५० कोटी रुपये होते.

देशमुख यांना एका महिन्यात १२० कोटींचे कर्ज कसे देण्यात आले? कमी कालावधीत त्यांना कर्ज कसे मिळाले? त्या बँकेने आतापर्यंत किती जणांना कर्ज दिले? याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून व्हावी, अशी मागणी आता भाजपने केली आहे.

रितेश आणि जेनेलिया यांना एमआयडीसीमध्ये कोणत्या निकषांच्या आधारे जमीन देण्यात आली आहे? असा प्रश्नही भाजप विचारत आहे. भाजपने केलेल्या आरोपांमुळे लातूर एमआयडीसी प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर रितेश आणि जेनेलिया यांची प्रतिक्रिया काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.