बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (Riteish Deshmukh And Genelia Deshmukh) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असतात. यामध्ये कधी ते दोघे मजा मस्ती करताना दिसून येतात तर कधी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना. त्यांच्या या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचीही फार पसंती मिळत असते. यादरम्यान आज ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने रितेश-जेनेलियाने एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जेनेलिया आणि रितेशने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, मागे ‘क्या से क्या हो गये देखते देखते’ हे गाणं वाजत आहे. या गाण्यावर रितेश आणि जेनेलिया नाराज असल्याचे एक्सप्रेशन देत आहेत. यासोबतच दोघांनी ‘हॅप्पी व्हॅलेंटाईन डे’ म्हणत शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यांचा हा रील व्हिडिओ चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत आहे. अनेकजण या व्हिडिओतील त्यांच्या एक्सप्रेशनचे कमेंट करत भरभरून कौतुक करत आहेत.
दरम्यान, रितेश आणि जेनेलिया २००३ साली आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दोघे जेव्हा हैदराबाद विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. परंतु, दोघांनीही याबाबत माध्यमांना माहिती लागू दिली नाही.
असेही बोलले जाते की, पहिल्याच चित्रपटानंतर जेनेलिया आणि रितेश साखरपुडा करणार होते. मात्र, रितेशचे वडिल विलासराव देशमुख यासाठी तयार नव्हते. जेनेलियाने रितेशला चांगला मित्र असल्याचे सांगत दोघांच्या अफेअरच्या बातम्यांना नकार दिले होते. २०१२ साली दोघे ‘तेरे नाल लव्ह हो गया’ हे चित्रपट करत होते. त्यादरम्यान दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर शेवटी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दोघांनी लग्न केले.
नुकतीच रितेश-जेनेलियाच्या पहिल्या भेटीला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने रितेशने पत्नी जेनेलियासाठी एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने जेनेलियासोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर करत ‘मी जे करतो त्याला प्रेम नाही ‘वेड’ म्हणतात’, असे कॅप्शन दिले होते. यासोबतच दोघांनीही त्यांचा एक धमाल डान्स व्हिडिओसुद्धा शेअर केला होता.
दरम्यान, रितेश-जेनेलिया लवकरच ‘वेड’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे रितेश देशमुख याद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. तर जेनेलिया या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. याशिवाय दोघेही ‘मिस्टर मम्मी’ नावाच्या एका कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
दीपिकाच्या ‘गेहराइयां’ चित्रपटावर रणवीर सिंहने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, मला तुझा..
मैं झुकेगा नहीं साला! इंस्टाग्रामवर दीड कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स असणारा अल्लू अर्जुन फक्त ‘या’ व्यक्तीला करतो फॉलो
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी अर्जुन कपूरने मोकळे केले मन; म्हणाला, ‘आमचे आयुष्य नरक झाले होते’