यंदाच्या आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिला संघाने धमाकेदार सुरुवात केली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानी संघाला 107 धावांनी पराभव करत स्पर्धेत जोरदार सलामी दिली आहे. त्यामुळे आता गेल्या वर्षी T20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारतीय संघाने घेतला आहे.
भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानला विजयासाठी 245 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी महिला फलंदाजांनी अक्षरशः नांग्या टाकल्या. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या T20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पाकिस्तानने पराभव केला होता.
या पराभवाचा बदला महिला संघाने घेतला. त्याचबरोबर महिला संघाने पाकिस्तानविरुद्ध विजयाची परंपरा कायम ठेवत स्पर्धेत दावेदारी ठोकली आहे. या सामन्यात भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक 4 बळी घेतले आहे. कर्णधार मिताली राजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे भारताची अवस्था 6 बाद 114 अशी झाली.
पाकिस्तानी गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतानाच भारताच्या स्नेह राणा आणि पुजा वस्त्रकर यांनी शतकी भागिदारी करत पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. त्यामुळे भारताला हा मोठा विजय खेचून आणणं शक्य झालं. त्यामुळे आता महिला संघाच्या या विजयामुळे त्यांचं फार कौतुक होत आहे.
भारतीय संघाने उभारलेल्या 245 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाची सुरुवात ही फार संथ झाली. त्यांनी सुरुवातीच्या दहा षटकांत फक्त 26 धावा केल्या होत्या. परंतु एकही विकेट गमावलेली नव्हती. परंतु 11 व्या ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाज राजेश्वरी गायकवाडने पाकिस्तानला पहिला झटका दिला.
तिने जवेरिया खानला 11 धावांवर बाद करत पव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट मिळवल्या. दिप्ती शर्माने पाकिस्तानच्या कर्णधारीची विकेट घेत दुसरा धक्का दिला. त्यानंतर स्नेह राणाने पाकची तिसरी विकेट घेतली.
भारताची सर्वात अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने सलामीवीर सिद्रा आमीनला 30 धावांवर बाद करत पाकिस्तानची चौथी विकेट घेतली. पाकिस्तानचा निम्मा संघ 70 धावा पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर भारताला ठराविक अंतराने विकेट मिळत गेल्या आणि विजयाचा मार्ग सुकर झाला.
दरम्यान भारताच्या डावाची सुरूवात शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी केली. पण 4 धावसंख्येवर भारताने शेफालीची महत्त्वपूर्ण विकेट गमावली. त्यांनतर स्मृती आणि दीप्ती शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची पार्टनरशिप करून संघाला चांगल्या स्थितीत आणले. त्यानंतर मागून आलेल्या मध्यमफळीतील फलंदाजांनीही आपलं योगदान देत चांगली धावसंख्या फलकावर लावली.