सध्या राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरू आहे. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर देखील हे दोन्ही गट आमने-सामने असून पक्षाचं चिन्ह गटाला मिळावं यासाठी संघर्ष करत आहेत.
हा सत्तासंघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरे गटाला आता मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिवालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
विधान परिषदेचे प्रधान सचिन राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवसेना पक्षास आता अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. राज्यातील या सत्तांतरानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. विधानपरिषदेत शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी असे पत्र शिवसेनेतर्फे देण्यात आले होते.
त्यानुसार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या विधासभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे.
दरम्यान, अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. परंतु, महाविकास आघाडीतील काँग्रेसने यावर आक्षेप नोंदवला आहे. शिवसेनेने आम्हाला न विचारता परस्पर निर्णय घेतला असा आरोप काँग्रेसने केला आहे.