केंद्रीय मंत्री स्मृती इराणी नुकत्याच पुण्यात येऊन गेल्या. दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन केले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. त्यातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून थेट शरद पवारांवर टीका केली आहे.
गोपीनाथ पडळकर म्हणाले, पवारांनी संस्कृती वर बोलू नये. पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल. पवारांना ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाची खरी हत्या पवारांनी केली आहे, आपल्या जवळच्या प्रस्थापितांना सत्तेत वाटा मिळावा यासाठीच पवारांची धडपड सुरू असून त्यांना ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही.
तसेच म्हणाले, तुमच्या बद्दलची सगळी माहिती आता महाराष्ट्राला झाली आहे. पूर्वी लोक तुमच्या विरोधात बोलत नव्हते. आता श्रीलंकेतील घराणेशाहीला कंटाळून लोकांनी जसा उद्रेक केला तसे पवारांच्या घराणेशाहीच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील, असे पडळकर म्हणाले.
पडळकर यांनी काँग्रेस मंत्र्यांवर देखील टीका केली. म्हणाले, काँग्रेस फक्त वसुली करण्यात मशगुल आहे, त्याचे मंत्री परदेशात गेले आहेत. त्यांची अवस्था ना घर का ना घट का अशी झाली आहे. जेलमध्ये जाण्यापेक्षा त्यांना राज गादी मिळाली आहे. झोपायला बंगले मिळाले आहेत.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांवर हात उगारणाऱ्या भाजपची कानउघडणी केली.
गरज पडली तर, कोर्टात जाऊ आणि ऐकायला तयार नसतील अशा लोकांचे हात तोडून हातात देऊ, अशी तिखट प्रतिक्रिया सुळे यांनी दिली होती. यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर निशाणा साधला. पडळकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर आरोप केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस याचं उत्तर काय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.