आजकाल लोक एखाद्या विशिष्ट गोष्टीत आपल्या नावाचा रेकॉर्ड व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. आतापर्यंत अनेक रेकॉर्ड झाले आहेत, पण कीर्तन क्षेत्रात वर्ल्ड रेकॉर्ड झालेले कधी ऐकले आहे का? होय, एका कीर्तनकाराने चक्क १२ तास २० मिनिटांचे कीर्तन करून जागतिक विक्रम केला आहे.
कीर्तन क्षेत्रात रेकॉर्ड करणारे कीर्तनकार हे जुन्नर येथील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावाचे आहेत. ते कीर्तनकार हभप बाजीराव महाराज बांगर या नावाने ओळखले जातात. त्यांनी सलग १२ तास २० मिनिटांचे कीर्तन करून जागतिक विक्रम केला आहे. १२ वर्षांपासून ते कीर्तन सेवा करत आहेत.
१७ तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही १२ तास कीर्तन का करू शकत नाही. असा निश्चय त्यांनी केला. १४ जून रोजी त्यांनी नारायण येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे सकाळी नऊ वाजता तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील तीन चरणांचा अभंग घेत कीर्तनाला प्रारंभ केला.
ते कीर्तन सलग १२ तास २० मिनिटानंतर संपवून त्यांनी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले. सध्या त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियासाठी हभप बाजीराव महाराज बांगर यांना किरण महाराज बनकर, माऊली महाराज कुंजीर, नितीन महाराज सुक्रे, विशाल महाराज बांगर, विठ्ठल महाराज पोपळघट, विठ्ठल जाधव व चंद्रकांत निकम यांच्यासह २२ जणांची साथ लाभली.
१२ तास २० मिनिटांचे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर तुकाराम महाराजांचे दहावे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे वतीने मेडल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच योगेश पाटे, जयहिंद ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, माऊली खंडागळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कुठलाही सराव नसताना गेली बारा वर्षापासून कीर्तन सेवा देणारे शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेत पावनखिंडीच्या लढाईत सतरा तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हीच त्यांची प्रेरणा ठरली, असे लोक आता त्यांनी केलेल्या रेकॉर्डबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणतात.