दिग्रस मतदारसंघाचे आमदार मंत्री संजय राठोड हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडे राठोड यांना लढत देऊ शकणारा नेता नव्हता. मात्र आता माजी राज्यमंत्री संजय देशमुख आणि बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
संजय देशमुख आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसैनिक होणार आहेत. देशमुख शिवबंध बांधणार असल्यामुळे आता दिग्रस मतदारसंघात चुरस निर्माण होणार अशी चर्चा सुरू आहे. तसेच बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनीही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधले आहे.
सुनील महाराज यांचा पक्षातील प्रवेश हा यवतमाळच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातील राजकारण कायमचे बदलणारा ठरू शकतो, असेही सांगितले जात आहे. आता देशमुख आणि सुनील महाराज यांच्या प्रवेशामुळे संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढल्या आहेत, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.
भावना गवळी यांचा लोकसभा मतदार संघ हा वाशिम आणि यवळतमाळ असा दोन जिल्ह्यांचा आहे. या मतदार संघात असलेला बंजारा समाज हा रोठोड आणि गवळी यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, सुनील महाराज यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे येथील गणित बदलणार आहेत.
सुनील महाराज यांचा प्रवेश हा दिग्रस मतदारसंघातून चारवेळा विधानसभेवर निवडून जाणाऱ्या राठोडांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी महंत सुनील महाराजांना शिवसेनेत आणून राठोड यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. कारण आजपर्यंत दिग्रस मतदारसंघातील बंजारा मते एकगठ्ठा राठोड यांना मिळत होती.
यामध्ये पोहरादेवी येथील महंतांची भूमिका महत्वाची होती. बंजारा समाजावर महंतांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून दिग्रस मतदारसंघात राठोड यांच्याविरोधात सुनील महाराज यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. सुनील महाराज यांना देशमुख यांचेही पाठबळ मिळणार असल्यामुळे राठोडांना निवडणूक जड जाणार, असल्याचे सांगितले जात आहे.