शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या बंडात महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे उद्या सकाळी सिल्लोडला येणार असल्याचे समजत आहे.
अब्दुल सत्तार हे हेलीकाॅप्टरने सिल्लोडला येणार असल्यामुळे पोलिसांनी आवश्यक सुरक्षा पुरवावी, असा अर्ज देण्यात आल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयातून कळवण्यात आले आहे. त्यांच्या समर्थनार्थ मतदारसंघात वाहन रॅली देखील काढण्यात येणार असून, सत्तार यांची जाहीर सभा देखील होणार आहे.
राज्यात सध्या सत्तांतराचा ड्रामा सुरू आहे. बंडखोरांच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज्यातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे त्याच ताकदीने शिंदे गटाकडून देखील प्रतिउत्तर दिले जात आहे. अशी स्थिती असताना खरंच सत्तार आसामच्या गुवाहटीमधून सिल्लोडमध्ये येणार ? की मग आपल्या पाठीशी किती लोक आहेत हे दाखवण्यासाठी केलेली ही खेळी आहे, याबद्दल चर्चा होत आहे.
दरम्यान, शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेची निवडणूक होऊन मतमोजणी झाल्यापासून एकनाथ शिंदे व त्यांच्यासह शिवसेना व अपक्ष असे पन्नासहून अधिक आमदार सुरत मार्गे गुवाहाटी येथील हाॅटेलात मुक्कामाला आहे.
तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून आपला मुक्काम मातोश्रीला हलवला आहे. पहिल्या दिवशी बंडखोर आणि राज्यातील शिवसैनिकांना भावनिक आवाहन केल्यानंतर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत.
उद्धव ठाकरेंनी मंत्रीमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत अनेक महत्वाचे ठराव करत बंड मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे राज्यात बंडखोर मंत्री व आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.