पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देहूत आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाषण देत लोकांना संबोधित केले. पण मोदींची देहू भेट एका वेगळ्याच कारणामुळे सर्वात जास्त चर्चेत आली आहे. ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी न देणे. (reason behind ajit pawar dont speak in dehu)
या कार्यक्रमावेळी पंतप्रधानांचे भाषण झाले, पण अजित पवारांना भाषणाची संधी दिली गेली नाही. अजित पवार राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित झाले होते. तसेच या कार्यक्रमाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्यात फडणवीसांनी भाषण केले होते.
अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूलाच बसलेले होते. तर दुसऱ्या बाजूला फडणवीस बसलेले होते. यावेळी सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं. त्यानंतर सुत्रसंचालकांनी थेट मोदींचे नाव घेतले. त्यामुळे मोदी भाषणाला गेले. अजित पवारांना भाषणाची संधी दिली गेली नसल्यामुळे राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि नेते अमोल मिटकरी यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. अशात याप्रकरणी आता उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने हैराण करणारी माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या भाषणाला पंतप्रधान कार्यालयानेच परवानगी नाकारली, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
अजित पवार यांना पंतप्रधानांच्या सभेत बोलू न देणे हे जाणीवपूर्वक असल्याचे म्हटले जात आहे. गेल्यावेळी अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज्यातील महत्वाच्या व्यक्तीची शिवराय व महत्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्ये निदर्शनास आणली होती, त्याचाच राग मोदी काढत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपला धारेवर धरले आहे. कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना भाषणाची संधी द्यायला हवी होती, पण ती दिली गेली नाही. विरोधी पक्षनेत्यांना भाषणाची संधी मिळते, पण उपमुख्यमंत्र्यांना नाही ही अयोग्य गोष्ट आहे. ही दडपशाही असून आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम करण्यात आले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.