बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अभिनित ‘झुंड’ (Jhund movie) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून शुक्रवारी (४ मार्च) हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट विजय बरसे नावाच्या एका क्रीडा प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी त्यांची भूमिका साकारली आहे. तर कोण आहेत हे विजय बरसे आणि त्यांनी केलेलं कार्य काय? याबद्दल जाणून घेऊया या लेखातून.
विजय बरसे हे नागपूरच्या एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलची ट्रेनिंग देऊन त्यांना खेळाडू बनवले होते. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. तसेच त्यांनी ‘स्लम सॉकर’ नावाच्या लीगचीही स्थापना केली. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात विजय बरसे यांची प्रेरणादायी कथा दाखवण्यात आली होती. या कार्यक्रमादरम्यान विजय बरसे यांनी त्यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडले होते.
विजय बरसे यांनी सांगितले होते की, २००० सालच्या दरम्यान ते नागपूरमधील हिसलॉप कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांना काही मुले पावसात तुटलेल्या बादलीला पायाने लाथ मारताना, त्याभोवती खेळताना दिसली होती. त्यानंतर त्यांनी त्या मुलांना फुटबॉल दिला. तेव्हा त्या मुलांनीही ते आनंदाने स्वीकारले होते.
विजय बरसे यांनी पुढे सांगितले की, या घटनेनंतर पुन्हा एकदा अशाच एका मुलांचा गट टेनिस बॉलभोवती खेळताना त्यांना दिसून आला होता. त्यानंतर त्यांना वाटलं की, या मुलांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यामुळे त्यांनी त्या मुलांना खेळाच्या मैदानात एकत्र घेऊन आले आणि त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. विजय बरसे यांना वाटलं की, ही मुले जोपर्यंत खेळाच्या मैदानात राहतील तोपर्यंत ते इतर वाईट प्रवृत्तीपासून दूर राहतील. देशाच्या भविष्य घडविण्यासाठी हेच युवक योगदान देऊ शकतील.
झोपडपट्टी फुटबॉल नावाने सुरु केली लीग
विजय यांनी त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून पुढे २००२ साली ‘झोपडपट्टी फुटबॉल लीग’ची सुरुवात केली. कालांतराने हाच खेळ ‘स्लम सॉसर’च्या नावाने प्रसिद्ध झाला होता. यादरम्यान काहींनी त्यांना विचारलं होतं की, त्यांनी लीगचं नाव झोपडपट्टी फुटबॉल असं का ठेवलं? तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, ‘मला माहित आहे की, ही सर्व मुले झोपडपट्टीतून आलेले आहेत. आणि मला त्यांच्यासाठीच काम करायचे आहे. म्हणून मी हे नाव ठेवलं’.
स्लम सॉसरला राष्ट्रीय पातळीवर ओळख
पुढे ‘स्लम सॉसर’ लीगचा विस्तार वाढत गेला. शहर आणि जिल्हा स्तरावर या लीगचे सामने होऊ लागले. त्यानंतर २००३ साली एका वृत्तपत्रात विजय बरसे यांच्या कामाबद्दल एक लेख छापून आला. त्यानंतर विजय बरसे प्रसिद्धीझोतात आले आणि त्यांच्या कामाची किर्ती सर्वत्र होऊ लागली. तसेच राष्ट्रीय स्तरावरही या लीगला ओळख मिळू लागली होती.
सुरुवातीला विजय यांच्याकडे निधी पुरवण्यासाठी कोणी प्रायोजक नव्हते. त्यामुळे ते स्वतः यासाठी पैसे खर्च करत होते. त्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलाला एका वृत्तपत्रातून त्यांच्या वडिलांच्या कामाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर वडिलांच्या मदतीसाठी ते भारतात परतले. २०१८ साली ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना विजय बरसे यांनी सांगितले होते की,’ मी एक क्रीडा प्रशिक्षक आहे. पण मी फुटबॉलच्या विकासाला चालना देत नाही. तर फुटबॉलच्या फुटबॉलच्या माध्यमातून मी विकासाला प्रोत्साहन देत आहे.
बरसे यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर
बरसे यांचा हा संपूर्ण प्रवास नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडला आहे. यासंदर्भात ई-टाईम्सशी बोलताना विजय बरसे यांनी म्हटले होते की, चित्रपटाचा ट्रेलर पाहून मी थोडा भावूक झालो. चित्रपटात भावना खूप सुंदररित्या दाखवण्यात आले आहेत. तसेच माझ्याच स्लम सॉसरमधील काही विद्यार्थ्यांना या चित्रपटात पाहून मला आनंद झाला. माझा प्रवास अत्यंत कठिण आणि आव्हांनानी भरलेला होता. त्याला मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. हा प्रवास पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: ‘भर जाते है जिंदगी में रंग कुदरत के’, धर्मेंद्र यांनी फार्महाऊसमधील रंगीबेरंगी फुलांची दिली माहिती
गंगुबाईच्या भूमिकेसाठी आलिया नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रींना देखील देण्यात आली होती ऑफर
१६ वर्षांपूर्वीची परंपरा सोलापुरकरांनी राखली, नागराजचे असे काही स्वागत केले की तो ही झाला चकित