अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत. त्यांचे लग्न कधी होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून आहे. अखेर ही जोडी विवाहबंधनात लवकरच अडकणार आहे याबद्दलची माहिती समोर आली आहे. पुढच्या महिन्यातच रणबीर-आलिया हे लग्नगाठ बांधणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. एक वर्षांपासून या जोडीच्या नात्याबाबत चर्चा होत आहे. रणबीर-आलियाने अनेकदा माध्यमांसमोरही खुलेपणाने एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र, हे दोघे नेमकं कधी लग्न करणार याची प्रतीक्षा सर्वांना लागून होती.
माहितीनुसार, आता रणबीर-आलिया हे पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नसोहळ्याला मोजके कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा हा लग्नसोहळा असेल.
रणबीर आणि आलियाने नुकतंच त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. त्यानंतरच्या प्रोजेक्ट्ससाठी होणाऱ्या शूटिंगच्या तारखाही त्यांनी लग्नसोहळ्याच्या हिशोबाने ठरवल्या असल्याचं कळतंय. त्यातच, रणबीरची आई नीतू कपूर यांनी नुकतीच सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या स्टोअरला भेट दिली. त्यामुळे लग्नाची तयारी सुरू असल्याचं समजत आहे.
रणबीर आणि आलिया हे उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता ते मुंबईतील चेंबूर इथल्या आरके हाऊसमध्ये लग्न करणार असल्याचं समजतंय. मात्र, अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख नेमकी किती याबद्दल माहिती मिळाली नाही.
या दोघांनी माध्यमांपासून आपलं रिलेशनशिप पुरेपूर लपवण्याचा काही काळ प्रयत्न केला होता. मात्र पुरस्कार सोहळ्यात, पार्ट्यांमध्ये अनेकदा सतत रणबीर-आलियाला एकत्र पाहिलं गेलं. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागली. अखेर त्यांनी एकमेकांचे प्रेम सोशल मीडियावर जाहीर केले, आणि आता त्यांचं लग्न देखील होणार आहे.