Share

दोन वर्षांपूर्वीच राणादाने दिली होती अंजलीबाईंवरच्या प्रेमाची कबुली, साखरपुड्यानंतर ‘ती’ पोस्ट चर्चेत

“तुझ्यात जीव रंगला” या मराठी मालिकेतून महाराष्ट्रातील घरा – घरात पोहोचलेल्या राणादा आणि अंजलीबाईंचा काल साखरपुडा पार पडला आहे. म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आता एका अधिकृत प्रेमाच्या नात्यात बांधले गेले आहेत. आता लवकरच हे दोघे विवाह बंधनातही अडकणार आहेत.

सध्या हार्दिक आणि अक्षयाच्या साखरपुड्याचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूपच आनंदी दिसत आहेत. मात्र यासगळ्यात हार्दिकची एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने दोन वर्षांपूर्वीच आपल्या प्रेमाची कबुली दिल्याची दिसत आहे. २०१९ मध्ये पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये हार्दिक अक्षयासोबत दिसत आहे.

त्याने या फोटोला, “पडद्यावरची सोज्वळ केमिस्ट्री नि पडद्यामागची निखळ मैत्री… याच्याही जरा पल्याडच आहे आमचं स्ट्रॉन्ग बाँडिंग..” असे खास कॅप्शन दिले आहे. ही पोस्ट दोन वर्षापूर्वींची असली तरी सध्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने अक्षयासोबतचे खास नाते आपल्या शब्दात मांडले आहे.

आता त्याची हीच पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दरम्यान “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेवेळीच अक्षया आणि हार्दिकच्या नात्याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या दोघांनी आपल्या नात्याविषयी कोणताही खुलासा केला नव्हता. आता त्यांनी थेट साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

अक्षया आणि हार्दिकच्या साखरपुड्याला या दोघांच्या कुटुंबासह काही कलामंडळी उपस्थित होते. सर्वांच्या आशीर्वादाने या दोघांनी आयुष्याच्या नवीन वळणावर पाऊल ठेवले आहे. राणादा आणि पाठकबाई म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या जोडीने खऱ्या आयुष्यातही एकत्र राहण्याची वचने घेतली आहेत.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now