मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार राणा दांपत्याच्या चांगलाच अंगलटी आला आहे. शनिवारी पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्यामुळे आपल्यावर दाखल झालेल्या एफआयआर रद्द करण्याची मागणी घेत राणा दांपत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र याठिकाणी देखील त्यांना दिलासा मिळालेला नाही. उच्च न्यायालयाने राणा दांपत्यावरील दुसरा गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी राणा दांपत्याने केली होती.
त्यानुसार, सोमवारी न्यायालयाने या याचिकेवर निकाल सुनावला आहे. यावेळी, “एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या निवासस्थानी किंवा त्याच्या निवासस्थानाबाहेर धार्मिक श्लोकांचे पठण करण्याची घोषणा करणे, हे त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे” असे न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे.
त्याचबरोबर, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या राणा दांपत्याच्या घोषणेने समाजात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती हे पोलिसांचे म्हणणे अनुचित नाही,” असे देखील न्यायालयाने नमूद केले आहे.
सगळ्यात शेवटी, “राणा दाम्पत्याविरोधात नोंदवण्यात आलेले गुन्हे हे दोन स्वतंत्र, भिन्न घटना असून त्या एकाच घटनाक्रमाचा भाग नाहीत. असे असले तरी त्यांना अटक करायची झाल्यास त्याआधी ७२ तासांची नोटीस देण्यात यावी” असे म्हणत न्यायालयाने राणा दांपत्याला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता राणा दांपत्याला पुढील दिवस कोठडीतच काढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार राणा दांपत्याने केला होता. मात्र यावेळी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी या दोघांवर कारवाई केली. यानंतर कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दांपत्यावर गुन्हा देखील दाखल केला. या प्रकरणात न्यायालयाने या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
खार पोलिसांनी राणा दांपत्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत. परंतु कायदेशीरदृष्ट्या एकाच प्रकरणात दोन गुन्हे दाखल करणे चुकीचे असल्याचे राणा दांपत्याच्या वकिलांनी सांगितले आहे. या दोघांवर राजद्रोहाच्या कलमांतर्गत आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
‘सोमय्या काय ‘त्या’ कारमध्ये मोदी असते तरी ती फोडलीच असती’; अभिनेत्रीकडून शिवसैनिकांचे कौतूक
२४ तास एसी, कूलर, पंखे चालवूनही वीज बिल निम्म्यावर येणार, वापरा ‘या’ खास Tricks
सहा दिवसांत बंद पडली ओलाची स्कूटर, बीडच्या तरुणाने गाढवाला बांधून काढली स्कूटरची धिंड
कार्यकर्त्यांनो..! ठोशास ठोसा असे उत्तर देण्याची तयारी ठेवा; आक्रमक झालेल्या पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश