Ramesh Pardeshi : मनोरंजन क्षेत्रात ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातून ओळख मिळवलेले पिट्या भाई म्हणजेच रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांनी अखेर राजकीय दिशाच बदलली आहे. काही तासांपूर्वीच त्यांनी “राष्ट्र प्रथम” असा संदेश देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेशातील स्वतःचा फोटो पोस्ट केला होता. या पोस्टनंतर ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. अखेरीस त्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी थेट भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पिट्या भाईचा पक्षप्रवेश पूर्ण झाला.
याचदरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या पुणे दौऱ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भर सभेत रमेश परदेशींना सुनावल्याची चर्चा जोरात होती. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेशातील फोटोवरून “एका विचारांत राहा, दोन नावं नको” अशा शब्दांत पित्या भाईवर टीका केल्याचं समोर आलं होतं. ही प्रकरणं शांत होण्याआधीच पिट्या भाईनं मनसे चित्रपट सेनेतील आपली भूमिका सोडून थेट कमळ हाती घेतलं.
पिट्या भाईच्या प्रवेशामागची कारवाई नेमकी काय?
रमेश परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर संघाच्या गणवेशातील आपला फोटो शेअर करत “मी माझ्या विचारांसोबत राष्ट्रप्रथम” असा संदेश दिला होता. त्यानंतर राजकीय क्षेत्रात त्यांच्या पुढच्या पावलांबद्दल विविध अंदाज व्यक्त होत होते. विशेष म्हणजे ते मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते, त्यामुळे ते मनसेच्या पुण्यातील मेळाव्यातही हजर होते.
या मेळाव्यातच राज ठाकरे यांनी त्यांना सरळ सवाल करत, “जर स्वतःला छाती ठोकून संघाचा कार्यकर्ता म्हणत असाल, तर इथे मनसेच्या कार्यक्रमात टाईमपास कशाला करता? एक ठिकाणी थांबा.” असे सांगितल्याची माहिती चर्चेत आली. मात्र स्वतः परदेशी यांनी या बातमीचं खंडन करत, बैठकीत असं काही घडलंच नसल्याचं सांगितलं होतं.
राज ठाकरे यांच्या सुनावणीच्या चर्चांनी तापलेलं वातावरण शांत होण्याआधीच रमेश परदेशी यांनी कमळ हाती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेशातील फोटो, त्यावरून उठलेली चर्चा आणि त्यानंतरचा सरकारी पक्षाकडे झुकलेला निर्णय या सर्व प्रकारामुळे पिट्या भाई पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.





