सध्या रशियाचा युक्रेनवर हल्ला सुरू आहे. या हल्ल्यात युक्रेनची स्थिती खराब झाली आहे. जगभरातून रशियाला हे युद्ध थांबवण्याचा सल्ला दिला जात आहे, मात्र रशिया थांबण्यासाठी तयार नाही. यातच आता कवितांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितेमधून युद्ध थांबवण्याचा सल्ला देत रशियाच्या राष्ट्रपतींवर निशाणा साधला आहे.
मंत्री रामदास आठवले नेहमीच विविध परिस्थितीवर कविता आणि डायलॉग बनवण्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या शैलीमुळे ते जास्त ओळखले जातात. मध्यंतरी त्यांनी कोरोनाच्या महामारीत कोरोनावर आधारित एक डायलॉग तयार केला होता, ज्याला अतिशय लोकप्रियता मिळाली होती. तो डायलॉग म्हणजे गो कोरोना गो…
सध्या जगात चाललेल्या परिस्थितीवर देखील त्यांनी आपली कविता केली आहे. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात युक्रेनची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. रशियाच्या या अमानुष कृत्यांवर जगातून विरोध होत असताना, आठवले यांनी देखील आपली कविता करून घटनेचा निषेध केला आहे.
आठवले यांनी युक्रेन युद्धाच्या गंभीर विषयावर कविता केली आहे. “पुतीनचा बिघडला आहे ब्रेन…म्हणून परेशान आहे युक्रेन” अशा शब्दांत त्यांनी कविता केली आहे. त्यांनी रशिया युक्रेन युद्ध थांबून चर्चेतून मार्ग काढावा आणि शांती प्रस्थापित झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केलीय.
तसेच त्यांनी यावेळी, छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणावरही भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणाला आरपीआयचा पूर्ण पाठिंबा आहे. संभाजीराजे आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी मोठा आवाज उठवला होता. महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी मराठा समाजाला जागृत केले होते. मी 2 मार्चला आजाद मैदानात त्यांच्या आंदोलनाला भेट देणार, असल्याचेही आठवले म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवर देखील भाष्य केले आहे. म्हणाले, नवाब मलिक यांना अटक व्हायला नको होती. नवाब मलिक माणूस चांगला आहे. परंतू जमिनीचे व्यवहार चांगले नाहीत. ईडीकडे त्यांच्या विरोधात पुरावे म्हणून अटक झाली आहे. त्यात भाजप सरकारचा काही संबंध नाही, असेही आठवले म्हणाले.