‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या बॉक्सऑफीस वर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या नऊ दिवसात या चित्रपटाने तब्बल 850 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाला मिळत जाणारे यश पाहून रामचरणने आरआरआर च्या संपूर्ण टीमला चक्क सोन्याची नाणी भेट म्ह्णून दिली आहेत.
RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली आहेत. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा भन्नाट प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रामचरण, ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत आलिया भट्ट आणि अजय देवगण हे बॉलिवूड स्टारसुद्धा झळकले आहेत.
RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ दाखवण्यात आला आहे. अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन क्रांतिकारकांभोवती चित्रपटाची कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. यामध्ये आलियाने सीता ही व्यक्तीरेखा साकारली आहे.
चित्रपटाने कमाईचा 850 कोटींचा टप्पा पार केला त्यामुळे, चित्रपटाला मिळणारे यश पाहून रामचरणने त्याच्या टीमला चक्क सोन्याच्या नाणी भेट म्हणून दिल्या आहेत. RRR च्या युनिट क्रू मेंबर्सना आणि टीममधील इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांना त्याने 10 ग्राम सोन्याचं नाणं भेट म्हणून दिल्याची माहिती मिळाली आहे.
चित्रपटाने कमाईचा 800 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर रामचरणने त्याच्या क्रू मेंबर्सना घरी चहापानासाठी बोलावलं आणि त्यावेळी त्याने सोन्याचं नाणं सर्व टीमला भेट म्हणून दिलं. यात कॅमेरा असिस्टंट्स, प्रॉडक्शन मॅनेजर्स, अकाऊंट्स, फोटोग्राफर्स आणि इतर सहाय्यकांना नाणं देण्यात आलं.
या सोन्याच्या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या सोन्याच्या नाण्यावर एका बाजूला RRR हे नाव आणि दुसऱ्या बाजूला रामचरण हे नाव कोरण्यात आलं आहे. सध्या त्यामुळे रामचरणची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे चाहते त्याच्या या कामामुळे त्याच्यावर अधिकच फिदा झाले आहेत.