Share

धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर राम गोपाल वर्मा म्हणाले, लग्न म्हणजे पूर्वजांनी लादलेली वाईट प्रथा

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमी काही ना कारणाने चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते नेहमी वादग्रस्त ट्विट्ही करत असतात. या ट्विट्समुळे त्यांना अनेकदा नेटकऱ्यांच्या टीकेलाही सामोरे जावे लागते. आताही राम गोपाल वर्मा यांनी अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटावर काही ट्विट्स केले. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले.

दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याने सोमवारी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ते दोघे विभक्त होत असल्याची घोषणा केली. १८ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धनुष सर्वत्र चर्चेत आला आणि ट्विटरवरही तो ट्रेंडमध्ये होता. धनुष आणि ऐश्वर्याच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. यादरम्यान राम गोपाल वर्मा यांनीही एका मागून एक असे तीन ट्विट करत लग्न ही पूर्वजांनी लादलेली वाईट प्रथा असल्याचं म्हटलं.

राम गोपाल वर्मा यांनी पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘घटस्फोटाचा आनंद संगीत ठेऊन साजरा करण्यात यावा. कारण यामुळे आपण एका बंधनातून मुक्त होतो. आणि दुसरीकडे लग्न हे गुपचूप केलं पाहिजे. कारण ते एकमेकांच्या धोकादायक गुणांची चाचणी करण्याची प्रक्रिया असते’.

दुसऱ्या ट्विटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी लिहिले की, ‘दुःख आणि उदासीनतेचे चक्र सतत सुरु राहण्यासाठी लग्न हे आपल्या पूर्वजांनी आपल्यावर लादलेली वाईट प्रथा आहे’.

त्यानंतर तिसरा ट्विट करत त्यांनी लिहिले की, ‘तरूणांना लग्नाच्या धोक्याबद्दल चेतावणी देण्यासाठी स्टार लोकांचे घटस्फोट हे चांगले ट्रेंड सेटर आहेत’. राम गोपाल वर्मा यांनी या ट्विटमध्ये धनुष आणि ऐश्वर्याचे प्रत्यक्षपणे नाव घेतले नसले तरी हे ट्विट त्यांच्यासाठीच होतं, असं अनेकांचं म्हणणं आहे.

राम गोपाल वर्मा यांच्या या ट्विट्सनंतर अनेकांनी त्यास विरोध दर्शवत त्यांना चांगलेच सुनावले. त्यांच्या ट्विटवर कमेंट करताना एकाने लिहिले की, ‘लग्न हे तुमच्या चित्रपटांसारखे वाईट नसतात’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘लग्न हे प्रेम, विश्वास, मैत्री आणि समजूतदारपणाचे सुंदर आणि पवित्र बंधन असते’.

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now