सध्या महाराष्ट्र राजकारण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळं ढवळून निघालं आहे. त्यातच आता राज ठाकरे यांच्यासंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राज ठाकरे हे नास्तिक असल्याचं म्हटलं गेलं आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेत आणि ठाण्यातील उत्तरसभेत मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. एवढेच नाही तर राज्य सरकारला त्यांनी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे. सरकारने मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेश देखील राज यांनी मनसैनिकांना दिले आहेत.
राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राज्यात शनिवारी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सर्वच राजकीय पक्ष महाआरती आणि हनुमान चालीसा पठणात गुंतल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांनीही शनिवारी पुण्यात हनुमान मंदिरात महाआरती केली आणि हनुमान चालीसा पठणही केलं.
राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमानाचा वार म्हणून शनिवारी हनुमानाची आरती करण्यात आल्यानंतर आता सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहेत. या पोस्ट मध्ये राज ठाकरे हे नास्तिक आहेत असे सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरेंना नास्तिक का म्हटलं याबद्दल चर्चा होऊ लागली.
व्हायरल झालेल्या बातमीनुसार, राज ठाकरे औरंगाबादहून पुण्याला जात असताना जेवणासाठी एका हॉटेलवर थांबले होते. त्यावेळी त्यांनी मटणाचा आस्वाद घेतला होता. कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, राज ठाकरे यांनी हनुमानाचा वार असलेल्या शनिवारीही मटण कसं खाल्लं? असा प्रश्न व्हायरल पोस्टद्वारे विचारला जातोय.
मात्र, या व्हायरल पोस्टची सत्यता पडताळल्यानंतर पुढे आले की, ही बातमी कालची नव्हती. तर काही महिन्यांपूर्वीची आहे जेव्हा राज ठाकरे औरंगाबाद दौरा आटोपून पुण्याकडे निघाले होते. तेव्हा केडगावच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी मटण खाल्लं होतं. या बातमीचा वापर करत काही युजर्सनी मसाला लावून परत एकदा काल ही बातमी व्हायरल केली आहे.